वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिची गेल्या गुरूवारी विश्व क्रीडा स्पर्धेत 2019 सालातील सर्वोत्तम ऍथलीट म्हणून निवड करण्यात आली. यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातर्फे (साई) 25 वर्षीय राणी रामपालचे या कामगिरीनंतर सत्कार करण्यात आला. साईतर्फे राणी रामपालला प्रमुख प्रशिक्षक म्हणून बढती देण्यात आली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांच्या हस्ते राणी रामपालचा सत्कार करण्यात आला.
विश्व स्पर्धा संपल्यानंतर 2019 सालातील या स्पर्धेतील सर्वोत्तम ऍथलीटच्या निवडीसाठी ऑनलाईनवरून मते मागविण्यात आली होती. तब्बल तीन आठवडय़ांच्या कालावधीत ही प्रक्रिया सुरू होती. त्यामध्ये राणी रामपालला 199, 477 अशी सर्वाधिक मते मिळाल्याने तिची विश्व स्पर्धेतील 2019 सालासाठी सर्वोत्तम ऍथलीट म्हणून घोषणा करण्यात आली. 2015 साली राणी रामपालने साहाय्यक प्रशिक्षक म्हणून साईमध्ये प्रवेश केला. आता तिला साईतर्फे बढती देण्यात आली असून ती आता साईची प्रमुख प्रशिक्षक राहील. 2016 साली राणी रामपालचा अर्जुन पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता.









