गटारींच्या दुरवस्थेमुळे सर्वत्र दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात : गटारी स्वच्छ करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. पण राणी चन्नम्मानगर परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. राणी चन्नम्मानगर परिसरातील गटारींची दुरवस्था झाली आहे. अशातच काही नागरिकांनी गटारीत सांडपाणी सोडले असल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथील गटारी स्वच्छ करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
संपूर्ण शहरातील कचऱयाची वेळेवर उचल करून स्वच्छता करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेचे अधिकारी करीत असतात. मात्र हा दावा फोल ठरला असून बाजारपेठ व्यतिरिक्त कचऱयाची उचल केली जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. शहरातील प्रुमख रस्त्यावरील कचराकुंडय़ा स्वच्छ तर भंगीबोळात कचऱयाचे ढिगारे असे चित्र विविध ठिकाणी पहावयास मिळत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी वर्षाला तीस कोटीहून अधिक निधी खर्चूनही बाजारपेठ व्यतिरिक्त अन्य परिसर स्वच्छ ठेवण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे. कचऱयाची उचल वेळेवर केली जात असल्याचा दावा करणारे आरोग्य अधिकारी कार्यालयात बसून पाहणीदौरा करीत आहेत का, असा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेने 20 पॅकेज करून कंत्राट दिले आहे. मात्र कंत्राटदाराकडून व्यवस्थित स्वच्छता करवून घेण्यास महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना आणि आरोग्य अधिकाऱयांना अपयश आले आहे. यामुळे उपनगरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरविकास खात्याने घातलेल्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्यानेच शहरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. कंत्राटदारावर महापालिकेच्या अधिकाऱयांचे नियंत्रण नाही. परिणामी रोजच्या रोज कचऱयाची उचल करण्यास कंत्राटदार चालढकल करीत आहेत.
यामुळे राणी चन्नम्मानगरमधील रस्त्याशेजारी कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेले कंटेनर कचऱयाने भरून वाहत आहेत.
जंतुनाशक पावडर मारणे आवश्यक
कचराकुंडय़ामधील कचऱयाची उचल व्यवस्थित करून जंतुनाशक पावडर मारणे आवश्यक आहे. मात्र कचऱयाची उचल केली जात नाही. कचरा टाकण्यात येणाऱया परिसरात पावडर मारण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. राणी चन्नम्मानगरमधील कचऱयाची उचल केली नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच ठिकठिकाणी गटारीमध्ये कचरा साचल्याने गटारी तुंबल्या आहेत. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. गटारी स्वच्छ करण्यात येत नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.









