प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील सर्व समुद्रकिनाऱयांची सफाई-स्वच्छता चांगली करण्यात येत असल्याचा दावा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी केला असून नवीन कंत्राट कंपनी नेमल्यानंतर समुद्रकिनारे अधिक स्वच्छ झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पर्यटनाशी संबंधित झालेल्या एका बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक होम स्टे व गेस्ट हाऊस नोंदणीकृत नसल्याने तेथे रहाणाऱया पर्यटकांची नोंद मिळत नाही. तसेच महसूलही बुडतो. म्हणून त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी मुदत देण्यात येणार असून नोंदणी न करता बेकायदेशीर व्यवसाय करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा आजगांवकर यांनी दिला.
पणजीतील पर्यटन भवनात ही बैठक झाली. त्यास कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, पर्यटन सचिव अशोक कुमार, पर्यटन खाते संचालक इतर अधिकारी वर्ग, पर्यटन संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यंदा 88 लाख पर्यटकांचे आगमन
यंदाच्या पर्यटन मोसमात गोव्यात 80 लाख देशी तर 8 लाख परदेशी पर्यटक आल्याची आकडेवारी आजगांवकर यांनी दिली. पर्यटकांची संख्या तशी काही खूप घटलेली नाही असा दावा आजगांवकर यांनी केला. पर्यटकांना चांगल्या सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न चालू असून पर्यटक वाढावेत म्हणूनही विविध देशातील विमान कंपन्यांशी बोलणी चालू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री मायकल लोबो यांनी पर्यटनवाठीसाठी अनेक सूचना केल्या.
अमली पदार्थांविषयी सरकार गंभीर असून ज्या ठिकाणी ते पदार्थ सापडतील तेथील पोलिसांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही आजगावकर यांनी दिला आहे. पर्यटकांची सुरक्षा व इतर नियम अटी मानण्यासाठी पर्यटक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









