267 नव्या रुग्णांची भर : गुलबर्ग्याला बुधवारीही धक्का
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत असून बुधवारी दिवसभरात राज्यात 267 नव्या रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुलबर्गा जिल्हय़ात सलग दोन दिवस 100 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत हा जिल्हा पहिल्या स्थानी आहे. या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 510 इतकी आहे. तर राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 4,063 वर पोहोचला आहे.
परप्रांतातून आलेल्या राज्यातील नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातून आलेल्यांचा यामध्ये अधिक समावेश आहे. बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या 267 रुग्णांपैकी 250 जण परराज्यातून परतलेले आहेत. राज्यात आतापर्यंत 1514 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 53 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता उपचार सुरू असणाऱया रुग्णांची संख्या 2494 इतकी आहे.
गुलबर्गा जिल्हा रुग्णसंख्येत राज्यात पहिल्या स्थानी आहे. या जिल्हय़ात बुधवारी 105 नव्या रुग्णांची भर पडली. तर उडुपीत 62, रायचूर 35, बेंगळूर शहरात 20, मंडय़ा 13, यादगिर 9, विजापूर 6, दावणगेरे 3, मंगळूर, म्हैसूर, बागलकोट, शिमोगा व कोलार जिल्हय़ात प्रत्येकी 2 तसेच धारवाड, बळ्ळारी, हासन आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळून आला आहे.
गदगमधील कोरोनाग्रस्ताचा किम्समध्ये मृत्यू
हुबळीच्या किम्स इस्पितळात ताप आणि मधुमेहावर उपचार घेत असलेला गदग जिल्हय़ाच्या लक्कुंडी येथील 44 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे गदग जिल्हय़ातील मृतांची संख्या 2 तर राज्यातील कोरोना बळींचा आकडा 53 वर पोहोचला आहे. ताप, मधुमेह आणि मूत्रपिंड विकारामुळे 27 मे रोजी सदर व्यक्तीला बेटगेरी येथील इएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, ताप कमी होत नसल्याने त्याला 1 जून रोजी किम्समध्ये दाखल करण्यात आले. त्याचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच बुधवारी त्याचा मृत्यू झाला. दुपारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.
राज्यात दिवसभरात 111 जण डिस्चार्ज
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दुसरीकडे संसर्गमुक्त होणाऱयांची संख्याही वाढत आहे. ही बाब राज्यातील जनतेच्या दृष्टीने दिलासा देणारी आहे. मागील 24 तासांत राज्यात 111 जण कोरोना संसर्गमुक्त झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हासनमध्ये बुधवारी सर्वाधिक 28 जण डिस्चार्ज झाले. तर बेंगळूर शहर जिल्हय़ात 19, दावणगेरे व चिक्कबळ्ळापूरमध्ये प्रत्येकी 13, मंगळूर 9, बेळगाव 7, बळ्ळारी 5, शिमोगा 4, विजापूर व गदग प्रत्येकी 3, कारवार आणि धारवाड जिल्हय़ात प्रत्येकी एकजण संसर्गमुक्त झाला आहे.









