308 नव्या रुग्णांची भर : बेंगळूरमध्ये तिघांचा बळी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात परप्रांतातून येणाऱयांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारी राज्यात 308 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर दुसरीकडे एकाच दिवशी 387 जण बरे झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच मागील आठवडाभरापासून राज्यात संसर्गमुक्त होणाऱयाची संख्याही वाढत आहे. त्यामुळे राज्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मागील 24 तासांत राज्यात 308 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 5,760 वर पोहोचली आहे. तर बेंगळूरमध्ये दोन पुरुष आणि एक महिला अशा तिघांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याच दरम्यान दिवसभरात 387 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामध्ये उडुपी जिल्हय़ातीलच 215 जणांचा समावेश आहे. यामुळे रुग्णसंख्येत हजाराच्या उंबरठय़ावर असणाऱया या जिल्हय़ाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सोमवारी गुलबर्गा जिल्हय़ात सर्वाधिक 99 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच यादगिरमध्ये 66, बिदरमध्ये 48, उडुपीत 45, बेंगळूर शहर 18, बळ्ळारी 8, गदग 6, शिमोगा आणि धारवाड प्रत्येकी 4, हासन व मंगळूर प्रत्येकी 3, बागलकोट 2 आणि कोप्पळ, रामनगर जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी 1 नवा कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यातील 277 जण परराज्यातील आहेत. तर एकटा परदेश प्रवास करून आलेला आहे.
संसर्गमुक्त होणाऱयांचा आकडाही वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत राज्यात अग्रस्थानी असलेल्या उडुपी जिल्हय़ात सोमवारी 215 जण बरे झाले. तसेच गुलबर्ग्यात 47, रायचूरमध्ये 29, विजापूर 29, यादगिर 23, हासन 16, मंडय़ा 11, धारवाड आणि तुमकूरमध्ये प्रत्येकी 6, हावेरीत 5 असे एकूण 387 जण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे संसर्गमुक्त झालेल्यांचा आकडा 2,519 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 3,175 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या 64 वर पोहोचली आहे.









