प्रतिनिधी/ पणजी
जगातील हजारो पर्यटक गोव्यात येतात त्यांना गोव्याच्या खऱया सांस्कृतिक वारशाचे दर्शन व्हावे यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने कला व संस्कृती संचालनालय शिल्पग्राम संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी लोकोत्सवाच्या समारोपप्रसंगी केले.
कला अकादमीच्या दर्यासंगमवर गेले दहा दिवस लोकोत्स्वाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राज्यातील लोकलांचे व हस्तकलांचे दर्शन घडविणाऱया लोकोत्सवाची सांगता काल रविवारी झाली. समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद गावडे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, गोवा सरकार उदयपूरच्या धर्तीवर गोव्यात शिल्पग्राम उभारणार आहे. गोवा म्हणजे केवळ समुद्र किनारे किंवा निसर्ग नव्हे तर सारा गोवा ग्रामीण लोक संस्कृतीत समावलेला आहे. याचे दर्शन नियोजित शिल्पग्रामात घडेल. सगळय़ांनाच नोकऱया मिळणे कठीण आहे. तेव्हा विविध कलाकारांनी आपल्या अंगातील कलात्मक गुण आत्मसाद करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास संधी प्राप्त करून दिली जाईल असेही त्यांनी शेवटी सांगितले.
समारोप कार्यक्रमाला व्यासपीठावर कला आणि संस्कृती संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब व भालचंद्र आमोणकर (प्रशासन) उपस्थित होते. मंत्री गावडे यांच्या हस्ते लोकोत्सवात सहभागी झालेल्या पथकांना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सणुण वेळीप यांनी स्वागत केले तर शेवटी अशोक परब यांनी आभार मानले. समारोप सोहळय़ानंतर विविध राज्यातील कलाकारांनी आपली पारंपरिक लोककला सादर करून रसिकवर्गाची मने जिंकली.









