उद्यापासून रविवारपर्यंत कडक अंमलबजावणी : 10 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू : रात्रीपासून पहाटेपर्यंत बाहेर पडण्यास बंदी
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाचा फैलाव प्रचंड वेगाने वाढू लागल्याने आणि कोरोनामुळे 18 जणांचे बळी गेल्यानंतर काल बुधवारी अचानकपणे सरकारने राज्यात तीन दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे तर येत्या 10 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून रविवार 19 जुलैपर्यंत तीन दिवस गोव्यात लॉकडाऊन जाहीर केले तर 15 जुलैपासून रात्री 8 ते पहाटे 6 पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली.
कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे 18 जणांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेते, विरोधी घटक आणि खुद्द सत्ताधारी भाजपचे आमदार व मंत्री यांच्याकडूनही लॉकडाऊनसाठी सरकारवर दबाव सुरू होता. अनेक नगरसेवक व जनतेकडूनही लॉकडाऊनची वारंवार मागणी सुरु होती. प्रसारमाध्यमांतूनही जनतेच्या भावना व्यक्त होत होत्या. पण सरकारने कधीच या मागणीकडे लक्ष दिले नाही. उलट लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असे खुद्द मुख्यमंत्री आणि सरकारमधील काही मंत्री स्पष्टपणे सांगत होते, मात्र काल अचानकपणे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, अपक्ष आमदार यांनी राज्यात लॉकडाऊन करण्याची मागणी कायम ठेवली होती. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बैठक घेतल्यानंतर कदाचित सरकारला जाग आली असावी. बैठक काल बुधवारी बोलावली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली. या बैठकीचे परिणाम म्हणूनही कदाचित तडकाफडकी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ग्रीन झोन असताना 44 दिवसांचे लॉकडाऊन
गोवा ग्रीन झोनमध्ये असताना व कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता अशावेळी राज्यात 44 दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर मांगोरहिल हॉटस्पॉट बनले. गोवाभरात मांगोरहिलशी संबंधित रुग्ण वाढू लागले, अशावेळीही सरकारने लॉकडाऊन केले नाही. कंटेनमेंट व मायक्रो कंटेनमेंट झोनच्या संख्येतही वाढ झाली. रुग्णसंख्याही झपाटय़ाने वाढली. रोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले. अखेर बुधवारी सरकार जागे झाले. विरोधकांच्या आणि लोकांच्या मागणीच्या दबावानंतर लॉकडाऊनची घोषणा झाली.
शुक्रवार ते रविवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन
दि. 17 ते 19 जुलैपर्यंत राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज गुरुवारी 16 रोजी रात्री 8 वा. पासून लॉकडाऊन सुरू होणार आहे. 20 जुलै रोजी सकाळी 6 वा. लॉकडाऊन संपुष्टात येईल. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती करण्याच्या दृष्टीने आणि काही प्रमाणात निर्बंध आणण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या काळात फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तोंडावर मास्क न वापरणाऱयांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. काही लोक मास्क वापरत नाही. सामाजिक दूरी पाळत नाहीत. काळजी घेतली जात नाही. त्यामुळे यावर निर्बंध वाढविण्यासाठी व जागृतीसाठी हा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी पाटर्य़ा होतात. लोक घराबाहेर पडतात. अनलॉक होताच अनेक ठिकाणी पाटर्य़ा झाल्या. पोलिसांनी, आरोग्य खात्याने चांगले काम केले, पण पुन्हा काळजी घेण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.
आजारी असल्यानेच मृत्यू
ज्या 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांना मोठमोठे आजार होते. कुणी कॅन्सर, तर कुणाला मधुमेह व इतर आजार होते असेच रुग्ण दगावले किंवा 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. एका व्यक्तीने ताप येत असताना पाच दिवस घरात काढले. अखेर श्वासोच्छवासाचा त्रास झाला. त्यावेळी इस्पितळात आणले. त्यामुळे मृत्यू झाला. कुणालाही ताप, खोकला येत असेल तर त्यांनी चाचणी करून घ्यावी. 18 पैकी 1 रुग्ण सोडला तर 17 जण आजारी होते, असे मुख्यमंत्री म्हणाले
गोव्यात कोरानामुळे 18 जणांचे मृत्यू झाले. एक हजारापेक्षा जास्त क्रियाशील रुग्ण आहेत. मोठय़ा प्रमाणात कोरोनामुक्त होत आहेत. पण तरीही लोक निर्बंध पाळत नाहीत. मास्क वापरत नाही म्हणून 40 हजार जणांना दंड दिले. कोठडीतही ठेवले पण लोक सुधारत नाहीत. सर्वाधिक प्रकरणे वाढू नये व त्यावर नियंत्रण यावे म्हणून सरकारने लॉकडाऊन केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व आरोग्य केंद्रात मोफत चाचण्या
राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात गोमंतकीयांसाठी मोफत कोविड चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर गरज पडल्यास जिल्हाधिकारी किंवा आमदारालाही संपर्क करावा, तसेच आरोग्य सेतू ऑप सर्वांनी डाऊनलोड करावे. जिल्हा इस्पितळातही चाचण्या करण्यात येत आहेत. गोव्यात 100 टक्के चाचण्या केल्या जात आहेत.
जनता कर्फ्यू काळात बाहेर पडू नये : मुख्यमंत्री
जनता कर्फ्यू राज्यात लागू करण्यात आला आहे. रात्री 8 ते सकाळी 6 वा. पर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा व रात्रीपाळीचे कामगार वगळता कुणी घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास पोलीस कारवाई करणार आहेत. लोकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये व घराबाहेर पडू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. जे औद्योगिक आस्थापनामध्ये काम करतात, त्यांना सूट असेल. मात्र त्यांनी पोलिसांना आपले कंपनी ओळखपत्र दाखवावे लागेल. तसेच मेडिकल, अत्यावश्यक सेवेला मोकळीक असेल.
प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर
प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी सरकार जागेची पाहणी करीत आहे. त्यामुळे त्याभागात कोरोनाबाधित होणाऱया रुग्णांना दुसऱया तालुक्यात हलवावे लागणार नाही. त्याचबरोबर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गोमंतकीयांची मोफत कोरोना चाचणी सध्या सुरू आहे. नवीन केअर सेंटरसाठी नर्स तसेच अन्य कर्मचारी भर्तीसाठी जाहिरात दिली जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता हा निर्णय घ्यावा लागत आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने व जुलै महिन्यात सर्वांधिक पाऊस पडत असल्याने 20 जुलैपर्यंत प्रकरणे वाढण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सार्वजनिक गणेश मंडळांनी आतापासून विचार करावा
आता श्रावण महिना सुरु होत आहे. नंतर गणेश चतुर्थी येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करणार यावर आतापासूनच विचार करावा. गोवा अशा स्थितीतून जात असताना त्यानी निर्णय घ्यायला हवा. सरकारही यावर विचार करीत आहे. सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले..
राज्यपालांसोबत आज उच्च स्तरीय बैठक
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आयोजित केलेली उच्चस्तरीय बैठक काल बुधवारी होऊ शकली नाही, ती आज गुरुवारी सकाळी राजभवनात होणार आहे. ही बैठक पुढे ढकलल्यानंतर सरकारने काल मंत्रीमंडळ बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यपाल कोरोनासंदर्भात सरकारला उपदेशाचे डोस देतील, अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत होती. मात्र त्या अगोदरच सरकारने लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करुन या बैठकीतचे गांभीर्य कमी केले, अशी चर्चा काल होती. आज होणाऱया बैठकीत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत.









