प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आठवडाभरापासून राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. रविवारी राज्यात 55 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1147 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत मंडय़ा जिल्हय़ात सर्वाधिक 22, गुलबर्गा 10, हासन 6, धारवाड 4, कोलार आणि यादगीरमध्ये प्रत्येकी 3, शिमोगा आणि मंगळूर जिल्हय़ात प्रत्येकी 2 तसेच कारवार, विजापूर आणि उडुपी जिल्हय़ात प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. यातील 42 जण परराज्यातून आलेले आहेत.
रोजगारानिमित्त मुंबईला गेलेले राज्यात परतत असून रविवारी मंडय़ा जिल्हय़ात त्यांच्यापैकी आणखी 19 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर उर्वरित तिघे जण रुग्ण क्रमांक 869 च्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त झाले आहेत. एकाच दिवशी 22 रुग्ण आढळून आल्याने मंडय़ा जिल्हय़ातील जनतेत भीतीचे वातावरण आहे.
गुलबर्गा जिल्हय़ातही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या जिल्हय़ात आतापर्यंत 104 कोरोनाबाधित आढळले आहेत. मागील 24 तासात 10 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 7 जण मुंबईहून परतलेले आहेत. या जिल्हय़ात मृतांची संख्या 7 असून केवळ चौघे जण संसर्गमुक्त झाले आहेत.
मंगळूर जिल्हय़ात 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या 52 वर पोहोचली आहे. कारवार जिल्हय़ातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भटकळमध्ये एका व्यक्तीला संसर्ग झाला आहे. या जिल्हय़ात आतापर्यंत 42 रुग्ण सापडले आहेत. धारवाड जिल्हय़ात काही दिवसांपूर्वी मुंबईहून परतलेल्या दोघांना संसर्ग झाला आहे. हासनमध्ये देखील 4 नवे रुग्ण सापडले आहेत. ते देखील मुंबईहून परतले होते.








