आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
भारतातही डेल्टा आणि डेल्टा प्लस या नव्या स्वरुपामध्ये कोरोना संक्रमण होत आहे. कर्नाटकातही म्हैसूरमध्ये अशा नव्या रुपातील कोरोना विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळून आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात डेल्टा प्लस रुपातील कोरोनाचे 44 रुग्ण आढळले आहेत, असेही ते म्हणाले.
बेंगळूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. म्हैसूरमध्ये डेल्टा प्लस रुपातील कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. बेंगळूरमध्येही असा रुग्ण आढळल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यात डेल्टा प्लस रुपातील कोरोना रुग्ण आढळल्याने प्रत्येक जिल्हय़ात 5 टक्के रँडम डेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारचे संशयित रुग्ण असणाऱया भागात रँडम टेस्टचे प्रमाण वाढविण्यात येईल.
डेल्टा रुपातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची माहिती गुप्त ठेवण्यात येत आहे. अनेक जण यातून बरे झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झालेला नाही. आता डेल्टा प्लस रुपातील कोरोनाबाबत माहिती घेतली जात आहे. त्याकरिता राज्यात 6 लॅबोरेटरिज स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या विषाणूवर नियंत्रणासाठीही प्रयत्न केले जातील, असे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
मुलांच्या उपचारासाठी 45 दिवसांत सज्जता
लस घेतल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होणार आहे. राज्यात आतापर्यंत 2 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. देवी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील समितीने अहवाल दिला आहे. त्यानुसार 45 दिवसांत मुलांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा आणि सज्जता ठेवण्यात येईल, असेही डॉ. सुधाकर म्हणाले.









