प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यु पाळण्याच्या आवाहनाला काल रविवारी देशभरात आणि गोव्यातही जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता पुढील तीन दिवस म्हणजे 25 मार्चपर्यंत जनता कर्फ्यु वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. जनता कर्फ्युमुळे गोव्यात पूर्ण शुकशुकाट दिसून आला. मार्केट, दुकाने बंद राहिली तर रस्ते निर्मनुष्य बनले. रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट दिसून आला. संपूर्ण गोवाच ओस पडल्याचे चित्र काल निर्माण झाले. सायंकाळी पाच वाजता लोकांनी टाळय़ा, थाळी वाजवून तसेच घंटनाद करुन सार्वजनिक सेवा बजावणाऱयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद लाबला. राज्यातील सर्व प्रमुख बाजार बंद राहिले. दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्यात आले. लोकांनी जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोक घरीच राहिल्याचे दिसून आले. दिवसाकाठी रस्त्यावर धावणारी लाखो वाहने बंद राहिल्याने रस्ते सुनसान दिसत होते. सकाळ ते दुपारनंतरही रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. गोव्यात जनता कर्फ्यु 100 टक्के यशस्वी झाला.
जनतेने व्यक्त केली कृतज्ञता
संध्याकाळी 5 वाजता लोकांनी आपल्या घराच्या गॅलरीत राहून किंवा घरातूनच टाळय़ा वाजवून कोरोनाच्या विरोधात काम करणाऱयांना टाळय़ा वाजवून, घंटानाद करून प्रोत्साहन दिले व आभारही व्यक्त केले. संध्याकाळी 5 वाजता गावागावातून आणि शहरातून लोकांनी टाळय़ांचा कडकडाट केला. घंटानाद केला. त्याचबरोबर थाळीचा नाद करून आपला पाठींबा व्यक्त केला. इस्पितळातील डॉक्टर, सफाई कामगार, प्रसार माध्यमे, पोलिस व जे लोक कोरोनाला थोपविण्यासाठी वावरतात अशा सर्वांनाच पाठिंबा व्यक्त केला.
जनता कर्फ्युमध्ये तीन दिवस वाढ
कोरोना संसर्गाची साखळी तुटावी या दृष्टीने गोव्यात पुढील तीन दिवस जनता कर्फ्युची मुदत वाढविण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तसे आवाहन केले. 25 मार्चपर्यंत जनता कर्फ्यु गोव्यात लागू होणार आहे. त्यामुळे सर्व व्यवहार तीन दिवस ठप्प राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणजे अग्निशामक दल, फार्मसी, इस्पितळे चालू राहतील. गुढीपाडव्यापर्यंत जनता कर्फ्यु लागू राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनता कर्फ्युमध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपचे नेते जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर लॉक डाऊन करण्यासंदर्भात कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशीही डॉ. सावंत यांनी चर्चा केली आहे.
गोव्याच्या सीमा सील
कोरोनापासून मुक्त राहण्यासाठी सरकारने गोव्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे आंतरराज्य वाहतूक बंद राहणार आहे. त्याचबरोबर पर्यटक वाहने बंद राहणार आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील काही दिवस कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील वाहनांना गोव्यात बंदी घालण्यात आली आहे.
बर्ड फ्ल्यूमुळे कोंबडय़ांची आयात बंद
कोरोनाचे संकट असतानाच कर्नाटक, केरळमध्ये बर्ड फ्ल्यू आला आहे. त्यामुळे या भागातून गोव्यात होणारी कोंबडय़ांची आयात बंद करण्यात आली आहे. कोरोनाबरोबरच बर्ड फ्ल्यूची धास्ती निर्माण झाली आहे.
जीवनावश्यक वस्तूंबाबत लोकांमध्ये चिंता
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जनता कर्फ्युच्या कालावधीत आणखी तीन दिवस वाढ झाली आहे. या कालावधीत मार्केट, दुकाने, अन्य व्यवहार ठप्प राहतील. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोव्यात दूध, भाजीपाला, फळे, कडधान्ये अन्य राज्यांतून आयात केली जातात. येता कालावधीत या वस्तू मिळतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मार्केट, दुकाने बंद राहिलयाने जीवनावश्यक वस्तू खरेदीचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाडव्यादिनी लागणारे कडधान्य व इतर साहित्य कसे मिळवायचे, अशी चिंता लोकांना लागली आहे. बिगर गोमंतकीय कामगार व दैनंदिन रोजंदारी करणाऱयांसमोर जीवनावश्यक वस्तूं मिळविण्याची मोठी समस्या आहे.
जनतेने सहकार्य करावे : मुख्यमंत्री
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व आस्थपने, कंपनी, उद्योग यांनी व्यवसाय बंद करणे गरजेचे आहे. 25 मार्च मध्यरात्रीपर्यंत जनता कर्फ्युमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणारी वाहने बंद करण्यात आली आहेत.
गोव्याबाहेरून येणाऱया गोमंतकीयांनी गोव्यात येताच आपली तपासणी करावी. गोव्याबाहेर अनेक गोमंतकीय शिक्षणासाठी, नोकरीसाठी वास्तव्य करून आहेत. त्यांनी गोव्यात येताच आपली तपासणी करावी व संशय असल्यास स्वतःला एकांतात ठेवावे. वृत्तपत्रातील सर्वांना विनंती आहे की त्यांनी पुढील तीन दिवस सोशल मीडियाचा वापर करावा. वृत्ते लोकांपर्यंत पोचवावी. वृत्तपत्रांच्या संपर्काच्या माध्यमातूनही कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जीवनावश्यक खरेदीसाठी वेळ द्यावा : बाबुश
अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जनतेला पुरेसा वेळ देणे व मिळणे गरजेचे असून संचारबंदी वाढीमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार असल्याचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे. एक दिवसाचा तरी अवधी आवश्यक होता. त्यानंतर संचारबंदी वाढवली असती तर चालले असते. अन्न-धान्य, भाजीपाला व इतर दुकाने खुली करायला हवी होती. संचारबंदी वाढवण्याचा निर्णय जनतेला गोंधळात टाकणारा तसेच त्रासदायक ठरणारा आहे, असे मतही त्यांनी प्रकट केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्युच्या कालावधीत वाढ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला लोक सहकार्य करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनेच सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करो, असे आवाहन त्यांनी केले.