बुधवारी राज्यात 9 नवे रुग्ण : गुलबर्ग्यात 4 महिन्यांच्या बालिकेसह मातेला संसर्ग
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न केल्याचा परिणाम म्हणून मागील चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बुधवारी राज्यात 9 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 427 वर पोहोचली आहे. गुलबर्ग्यात 4 महिन्यांच्या बालिकेसह 5 जण, बेंगळूर आणि म्हैसूर जिल्हय़ातील प्रत्येकी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात बुधवारी 9 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघजण संसर्गमुक्त झाले असून एकूण संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 131 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 17 जण मृत्यूमुखी पडले आहेत. गुलबर्गा आणि बेंगळूर शहर जिल्हय़ात प्रत्येकी 4, विजापूर आणि चिक्कबळ्ळापूरमध्ये प्रत्येकी 2, बेळगाव, मंगळूर, चित्रदुर्ग, गदग, बागलकोट जिल्हय़ात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
गुलबर्ग्यात बुधवारी 4 महिन्यांच्या बालिकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे 46 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला आणि 25 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 25 वर्षीय महिला ही 4 महिन्यांच्या बालिकेची माता आहे. या सर्वांवर गुलबर्गा इएसआय इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
बेंगळूरमध्ये 54 वर्षीय आणि 28 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर म्हैसूर जिल्हय़ात आढळून आलेले दोन्ही कोरोनाबाधित रुग्ण हे नंजनगूड तालुक्यातील असून ते ज्युबिलियंट फार्मा कंपनीशी संबंधित आहेत. येथील 56 वर्षीय व्यक्तीला 36 वर्षीय कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला आहे. ही व्यक्ती 18 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आढळली होती. तर 32 वर्षीय युवकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.









