म्हैसूरमध्ये कोरोनाचे 7 नवे रुग्ण : तबलिगच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चौघांचा समावेश
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 144 वर
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यावाढीचा आलेख कमी असताना शनिवारी एकाच दिवशी 16 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 144 वर पोहोचली आहे. राज्यात या जीवघेण्या विषाणूमुळे चौघांचा बळी गेला असून 11 जण संसर्गमुक्त झाले आहेत. शनिवारी म्हैसूरमध्ये 7, बेंगळूरमध्ये 4, मंगळूर 2, बळ्ळारी, उडुपी आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात प्रत्येकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कोरोनासंबंधी आकडेवारी देण्यासाठी राज्य आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध करण्यात येणारी हेल्थ बुलेटीन प्रसिद्ध केल्यानंतर मंत्री एस. सुरेशकुमार यांनी ही माहिती दिली. बेंगळूरमध्ये घरकाम करणाऱया कोरोना पॉझिटिव्ह महिलेमुळे 21 वर्षीय युवकाला तसेच त्याच्या 57 वर्षीय वडिलांनाही संसर्ग झाला आहे. शिवाय 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे आणि 17 मार्च रोजी दुबईहून परतलेल्या 78 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
म्हैसूरमध्ये दिल्लीतील तबलिगच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाला कोरोनाबाधितामुळे संसर्ग झाला आहे. तर अन्य दोघांना कसा संसर्ग झाला, हे अद्याप समजलेले नाही. उडुपीत 22 मार्च रोजी दुबईहून आलेल्या 63 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. त्याचप्रमाणे मंगळूरमध्ये 3 आणि 52 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरले आहेत.
होस्पेटमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना लागण
बळ्ळारी जिल्हय़ातील होस्पेटमधील एस. आर. नगर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह शेजारील 10 जणांना जिल्हा इस्पितळात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या एका 47 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उर्वरित 9 जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे.









