आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर : आजपासून 45 वर्षांवरील व्यक्तींना लस
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात देखील गुरुवार दि. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 5 हजार केंद्रांमध्ये लस दिली जाणार असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे.
मंगळूर जिल्हय़ातील जिल्हा आरोग्य क्षेत्रासंबंधी वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. अलिकडेच 3 हजार केंद्रांमध्ये लसीकरण अभियान सुरू आहे. आता नव्याने 2 हजार लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. गुरुवारपासून एकूण 5 हजार केंद्रांमध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. एका केंद्रात दिवसाला 100 जणांनी लस घेतल्यास 5 लाख तर 50 जणांनी लस घेतली तर दिवसाला अडीच लाख जणांना लस मिळणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जनतेने स्वयंस्फूर्तीने लस घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
केरळ आणि मंगळूरमधील जनतेचे घनिष्ठ संबंध आहेत. या दोन्ही भागांमध्ये लोकांचा मोठय़ा प्रमाणात संचार आहे. मात्र, केरळ राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तेथून कर्नाटकात येणाऱयांकडे आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. त्यामुळे अहवाल तपासणीसाठी काटेकोरपणे कार्यवाही केली जावी, अशी सूचना मंगळूर जिल्हा प्रशासनाला देण्यात येईल, असे ते म्हणाले.
राज्यात बुधवारी कोरोनाचे 4,225 नवे रुग्ण
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असून बुधवारी राज्यभरात तब्बल 4,225 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारी राज्यात 2,975 रुग्ण आढळून आले होते. बुधवारी दिवसभरात केवळ 1,492 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान मागील चोवीस तासांत राज्यात 26 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 28,248 इतकी झाली आहे.









