बेंगळूर
लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात देखील कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1,500 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 73 जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी दिली आहे. शनिवारी कोडगू जिल्हय़ातील मडिकेरी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोनाबाधित पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी आपण राज्यभर दौरा करणार असून सर्व जिल्हा केंद्रांना भेटी देणार आहे, असे ते म्हणाले. राज्यात अमली पदार्थ विक्री आणि सेवनासंबंधी पोलिसांकडून व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारही ड्रग्जच्या आहारी गेल्याची माहिती मिळाली असून संबंधितांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.









