बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई : तीन अधिकाऱयांना दणका
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाच्या अधिकाऱयांनी (एसीबी) मंगळवारी तीन अधिकाऱयांच्या मालमत्तांवर छापे टाकले. एकूण 12 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एसीबी अधिकाऱयांच्या हाती मोठय़ा प्रमाणात घबाड सापडल्याचे समजते. बेळगाव, बागलकोट आणि गुलबर्ग्यात धाडी टाकून मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळणी करण्यात येत आहेत.
बागलकोटचे भू-प्रमाणपत्रे विभागाचे संचालक गोपाल एम. मालगत्ती, गुलबर्ग्यातील मागासवर्ग विकास निगमचे अधिकारी जगदेवप्पा आणि बेळगावमधील कायदा मापनशास्त्र विभागाचे साहाय्यक नियंत्रण सुरेंद्र उप्पार यांच्यावर एसीबीने कारवाई केली आहे. या कारवाईत दागिने, रोख रक्कम, भूखंड, बंगले, बहुमजली इमारतीतील फ्लॅट आदी मालमत्तेचा तपशिल जमा करण्यात येत आहे.
बागलकोट आणि विजापूरमध्ये भू-प्रमाणपत्रे विभागाचे उपसंचालक गोपाल एल. मालगत्ती यांच्या कोप्पळमधील बंगला, बागलकोट जिल्हय़ातील सरकारी निवासस्थान, कार्यालय आणि प्रभारी म्हणून सेवा बजावत असलेल्या विजापूरमधील कार्यालयावरही एसीबी पथकांनी एकाच वेळी छापे टाकले.
गुलबर्गा आणि यादगिर जिल्हय़ातील देवराज अर्स मागासवर्ग विकास निगमचे अधिकारी जगदेवप्पा यांच्यावर छापे टाकण्यात आले. गुलबर्गा जिल्हय़ातील पूजा कॉलनी येथील बंगला, सीटी स्क्वेअर येथील व्यापारी संकुलातील दुकान, कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. बेळगावमध्येही छापा टाकून सुरेंद्र उप्पार यांच्या मालमत्तांची पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, अधिकाऱयांनी किती बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे, याबाबतची माहिती उघड केलेली नाही.









