प्रतिनिधी /पणजी
गोवा निवडणूक आयोगाने आतापर्यंत 6.30 कोटी रुपये रोख रकमेसह सुमारे 10.13 कोटी रुपये किंमतीची सामुग्री जप्त केली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आयएएस कुणाल यांनी दिली.
आल्तिनो येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जप्त केलेल्या सामुग्रीमध्ये रोख रकमेव्यतिरिक्त 2.44 कोटींचे मद्य, 1.06 कोटींचे ड्रग्ज, मेटल 0.02 कोटी, मोफत भेटवस्तू 0.30 कोटी यांचा त्यात समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारासाठी रोड शो, पदयात्रा, सायकल/मोटरसायकल मिरवणूक, यावरील बंदीत आणखी वाढ करताना ही मुदत दि. 11 फेब्रुवारी पर्यंत वाढविली आहे. दि. 1 ते 11 फेब्रुवारी असा बंदी कालावधी असेल. असे असले तरीही त्याच कालावधीत होणाऱया खुल्या जागेतील जाहीर सभा तसेच घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीसाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
खुल्या जागेत किंवा बंद सभागृहात प्रचारसभा घेण्यासाठी 498 जागा निश्चित करण्यात आल्या असून त्याशिवाय अन्य कोणत्याही ठिकाणी सभा घ्यायची असल्यास राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यालयास कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात सध्या 11 लाख 64 हजार
राज्यात सध्या 11,64,224 नोंदणीकृत मतदार असून जानेवारी महिन्यात अंतिम यादीनुसार 9361 नवीन मतदारांची भर पडली आहे. राज्यात एकुण 9590 दिव्यांग तर 29797 मतदार 80 पेक्षा जास्त वयाचे आहेत. त्याशिवाय 41 वारांगना आणि 9 तृतीयपंथी मतदारांचीही नोंदणी करण्यात आली आहे.
राज्यात एकूण 298 कर्मचारी ईटीपीपीएस पोस्टल मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. उमेदवारांची संख्या निश्चित आणि त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर पुढील दोन दिवसात सदर कर्मचारी आपले मतदान करणार आहेत, अशी माहिती कुणाल यांनी दिली.
राज्यात एकुण 17022 मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेथे रॅम्प, पाणी, वीज, आदी व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 676 मतदार मतदान करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 14 रोजी सकाळी 7 ते सायं. 6 पर्यंत (11 तास) मतदानासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा कुणाल यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात एकुण 81 भरारी पथके कार्यरत असून सी-व्हिजील ऍपच्या माध्यमातून अनेक तक्रारी मिळत आहेत. आतापर्यंत 398 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील 253 ग्राह्य धरण्यात आल्या आहेत, असे कुणाल यांनी सांगितले.
जाहीर सभा, प्रचाराच्या उपस्थिती मर्यादेत वाढ
त्यानुसार खुल्या जागेतील जाहीर सभेसाठी उपस्थितीची मर्यादा सध्याच्या 500 च्या जागी 1000 पर्यंत वाढविण्यात आली आहे. किंवा मैदानाच्या क्षमतेच्या 50 टक्के एवढी उपस्थिती ठेवता येऊ शकणार आहे. तर उमेदवारासोबत फिरणाऱया कार्यकर्त्यांची मर्यादा सध्याच्या 10 च्या जागी 20 (सुरक्षा रक्षक वगळून) पर्यंत वाढविता येणार आहे. बंद सभागृहात होणाऱया बैठकांसाठीही उपस्थिती वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार पूर्वीच्या 300 च्या जागी आता 500 लोक उपस्थित राहू शकणार आहेत.
तब्बल 13,284 वयोवृद्ध करणार घरातून मतदान
यंदा प्रथमच 13284 वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार असून त्यासाठीच्या मतपत्रिका छापण्याचे काम प्रारंभ करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी अशा प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पूर्ण सुरक्षित पद्धतीने त्यांचे मतदान करून घेणार आहेत.









