लोकांना हळूहळू मिळू लागला रोजगार – 12 टक्क्यांवरून 8.7 टक्क्यांवर बेरोजगारी दर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाचे घटत चाललेले संक्रमण आणि राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्याचा रोजगारावर सकारात्मक प्रभाव दिसू लागला आहे. लोकांना हळूहळू का होईना रोजगार मिळण्यास सुरुवात झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) डाटानुसार 13 जून रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात देशाचा बेरोजगारी दर कमी होत 6 आठवडय़ांचा नीचांकी स्तर 8.7 टक्क्यांवर आला आहे.
असंघटित क्षेत्राला निर्बंधांपासून सूट देणे सुरू झाले आहे. हेच रोजगार परतण्याचे मुख्य कारण आहे. सीएमआयईच्या डाटानुसार 13 जून रोजी समाप्त आठवडय़ात शहरी बेरोजगारी दर कमी होत 9.7 टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात शहरी बेरोजगारी दर 14.8 टक्के होता.
मागील काही आठवडय़ांशी तुलना केल्यास ही घसरण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. 30 मे रोजी समाप्त आठवडय़ात शहरी बेरोजगारी दर 17.88 टक्के इतका होता. 13 जून रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात यात 8.18 टक्क्यांची घसरण राहिली आहे. तर 6 जून रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ाच्या तुलनेत 3.6 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
ग्रामीण बेरोजगारी दरही घटला
अशाच प्रकारे ग्रामीण बेरोजगारी दरात सुधारणा झाली आहे. मे महिन्यात ग्रामीण बेरोजगारी दर 10.63 टक्के होता. तर 13 जून रोजी समाप्त आठवडय़ात हा दर 8.23 टक्के राहिला आहे. ग्रामीण बेरोजगारी दरात मागील दोन आठवडय़ांमध्ये 2.4 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. सीएमआयईनुसार मे महिन्यात देशातील बेरोजगारी दर 12 टक्क्यांहून अधिक होता. जानेवारी ते एप्रिलदरम्यान बेरोजगारी दर 6.52 ते 7.97 टक्क्यांदरम्यान होता. एप्रिलमध्ये देशात बेरोजगारी दर 7.97 टक्के राहिला होता. या दरावर एप्रिलमध्ये 73.5 लाख लोकांना रोजगार गमवावा लागला होता. यात वेतनाच्या 34 लाख नोकऱया सामील होत्या.
मागील वर्षी संकट
मागील वर्षी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारी दर 23.52 टक्क्यांवर पोहोचला होता. आर्थिक सुधारणांमुळे जानेवारी 2021 मध्ये बेरोजगारी दर कमी होत 6.52 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. पण कोरोनाच्या दुसऱया लाटेचा एप्रिल आणि मे महिन्यात जॉब मार्केटवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. या दोन्ही महिन्यांमध्ये 2.3 कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. यात वेतनयुक्त आणि वेतनरहित दोन्ही प्रकारचे रोजगार सामील होते.
निर्बंध हटल्याने….
कोरोनासंबंधी निर्बंध हटल्याने संघटित क्षेत्रातील कामगारांना मदत मिळत आहे. तसेच छोटे व्यावसायिक पुन्हा काम सुरू करत आहेत. पण संघटित क्षेत्राची रिकव्हरी मागणी वाढल्यास जलद होणार आहे.









