प्रतिनिधी / सातारा :
राज्यसेवेची पूर्व परीक्षा सातारा जिल्ह्यात 39 केंद्रावर शांततेत पार पडली. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून 16 हजार 69 जणांनी नोंदणी केली होती. परीक्षा केंद्रावर गर्दी केल्याने सातारा शहरात वाहतूकीची कोंडी कित्येक दिवसानंतर झाली होती.
कोरोनामुळे राज्यसेवेची गतवर्षीची परीक्षा पुढे ढकण्यात आली होती. ती परीक्षा राज्य सरकारने शनिवारी घेतली. साताऱ्यात ही परीक्षा 39 केंद्रावर घेतली होती. त्यामध्ये कराडमध्ये 9, वाईमध्ये 5, कोरेगावात 3 आणि सातारा शहरात 22 केंद्रावर ही परीक्षा पार पडली. कोरोनामुळे अद्याप बसेस पूर्ण क्षमतेने नसल्याने परीक्षार्थीना दुचाकीवरुनच परीक्षा केंद्र गाठावे लागले. परीक्षा केंद्रावर कोरोनाचे नियम पाळुन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेकरता नोंदणी केलेल्या 16 हजार 69 जणांपैकी 10 हजार 692 जणांनी परीक्षा दिली.









