नवी दिल्ली / प्रतिनिधी
मंगळवारी राज्यसभा अध्यक्षांनी मतदानाची परवानगी न दिल्याने तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या भुमिकेमुळे, निवडणूक कायदे बदलण्याच्या विधेयक मंजूरीवेळी राज्यसभेत प्रचंड नाट्य घडले. ओब्रायन यांच्या वागणुकीचा सरकारने निषेध केला तर विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.
या घडामोडीनंतर खासदार डेरेक ओब्रायन यांना मंगळवारी सभागृहात गैरवर्तन केल्याबद्दल चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. निवडणूक कायदा (दुरुस्ती विधेयक) 2021 वर झालेल्या चर्चेदरम्यान राज्यसभेचे नियम पुस्तक सभापतींच्या दिशेने फेकल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. राज्यसभेने मंगळवारी मतदार यादीचा डेटा आधारशी लिंक करण्यासाठी निवडणूक कायदा (सुधारणा) विधेयक, 2021 मंजूर केले. यावेळी विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. त्याचवेळी डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेतून बाहेर पडण्यापूर्वी दोन मिनिटे या विधेयकावर भाषण केले.
या कारवाईबाबत, खासदार डेरेक ओब्रायन यांनी ट्विट केले की, ‘मागील वेळी सरकार कृषी कायदे मंजूर करत होते त्यावेळीसुद्धा मला राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते, त्यानंतर काय झाले हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. भाजप लोकशाहीची चेष्टा करत आहे आणि जबरदस्तीने निवडणूक सुधारणा कायदा मंजूर करून घेत आहे आणि त्यासाठीच आज मला निलंबित करण्यात आले आहे.आणि हे विधेयकही लवकरच रद्द होईल.









