लहानपणी आपल्या काय काय इच्छा असतात. त्यातल्या बहुतांशी कधीच पुऱया होत नाहीत. काही वेळा आपण त्या विसरूनदेखील जातो. इयत्ता दुसरी ते चौथीत असताना मी पुण्यातल्या रास्ते वाडय़ात भरणाऱया सरदार लक्ष्मीबाई रास्ते प्राथमिक विद्यालयात होतो. चौथीत असताना माझी जागा पुढच्या रांगेत होती. डाव्या बाजूला दरवाजा बाहेर एका चबुतऱयावर मोठी घंटा टांगलेली असे. शाळा सुटायला थोडा वेळ उरलेला असताना गोविंदा शिपाई घंटेपाशी येऊन उभा राही. त्याच्या मनगटावर घडय़ाळ असे. बरोबर वेळेवर तो घंटेचे टोल द्यायचा नि आम्ही आनंदाने जोरजोरात ओरडत दप्तरे चपला सांभाळीत घराकडे पळायचो. आपण मोठेपणी गोविंदा शिपाई व्हावं आणि रोज लवकर घंटा वाजवून मुलांना सोडावं अशी माझी महत्त्वाकांक्षा होती. हायस्कूलात गेल्यावर इतिहास विषय शिकलो तेव्हा लंडनला जाऊन आपण कोहिनूर हिरा, भवानी तलवार वगैरे वस्तू तिथून पळवून आणल्यात आणि शाळेचे वर्गशिक्षक-मुख्याध्यापक आपलं कौतुक करताहेत असं स्वप्न अनेकदा बघितलं होतं. मी हे धाडस करताना मला पकडून दिलं आहे आणि त्याबद्दल इंग्लंडच्या राणीनं बक्षीस देऊन एक गोरी बायको देखील दिली आहे असं माझ्याच एका मित्राचं स्वप्न होतं. मोठेपणी तो राजकारणात गेला असं कानावर आलं.
शिक्षण पुरं झाल्यावर नोकरी लागली. आपण कायम पर्सोनेल विभागातील मुख्य अधिकारी व्हावं. प्रिय व्यक्तींना मनाजोगत्या बदल्या आणि बढत्या द्याव्यात, नकोशा व्यक्तींना लांब हाकलावं अशी माफक महत्त्वाकांक्षा होती.
एका व्यक्तीची अशी महत्त्वाकांक्षा पुरी झाल्याचं मी बघितलं देखील होतं. त्याच काळात एक खूपच गरीब स्थितीतला इसम सरकारी रुग्णालयाबाहेर हातगाडीवर केळी विकताना पाहिलेला. अचानक तो तिथल्या मनपात निवडून आला आणि सोन्याचे किलोभर दागिने परिधान करून विदेशी कारमधून हिंडताना दिसला. तेव्हा मलाही आयुष्यात एकदा तरी नगरसेवक व्हावंसं वाटलं होतं. पण आपल्याला कोण निवडून देणार.
म्हातारपण आलं. सगळी स्वप्ने बालीश वाटू लागली. परवा पेपरात बातमी वाचली. एका निवृत्त सुशिक्षित महिलेला म्हणे राज्यपाल होण्याचं स्वप्न पडलं. तिला राज्यपाल करण्याचं आश्वासन देऊन एका ठकाने तिच्याकडून आठ-नऊ कोटी लुबाडले. कोटय़ावधी रुपये खर्च करून राज्यपाल झाल्यावर तिला काय मिळणार होतं हे कोडं मला अजून उलगडलेलं नाही!








