मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात तौक्ते चक्रीवादळ, कोरोना महामारीचे संकट असतानाच दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. यातच गेल्या काही दिवसापासून शांत झालेल्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊतांनी याच मुद्यावरुन राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे. “राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात”, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली. तर, या नियुक्तीसाठी राज्यपालांना फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे खूपच काम करत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांवर अजूनपर्यंत निर्णय का घेतला नाही ते स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल कोश्यारी यांना दिलेत. 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडं शिफारसीद्वारे 12 नावे पाठवली. यावर राज्यपालांनी निर्णय घ्यायला हवा, शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून ते बसू शकत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले.
Previous Articleकर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये वाढतोय कोरोनाचा धोका
Next Article कोल्हापूर : उघड्यावर कचरा टाकण पडलं पाच हजारांना








