क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
नेहरूनगर येथील युवजन क्रीडा खाते व नेहरू केंद्र आयोजित कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन, राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष जगदीश पाटील, युवजन क्रीडा खात्याचे उपसंचालक बसवराज मिलानट्टी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रेमा कुलकर्णी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक क्रीडाधिकारी बसवराज मिलानट्टी यांनी केले. मैदानात आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या ज्योती होसट्टी (कोरी) यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी क्रीडाज्योतीचे स्वागत केले. शांतीचे प्रतीक असणारी कबुतरे व रंगीबेरंगी फुगे हवेत सोडवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
व्ही. एस. पाटील यांनी सर्व क्रीडापटूंना शपथ दिली. दोन दिवस चालणाऱया या स्पर्धेत व्हॉलिबॉल, थ्रोबॉल, कबड्डी, बॉल बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल, हॉकी आदी खेळांचा समावेश असून, ऍथलेटीक्सचाही समावेश आहे.
सूत्रसंचालन अंजना मुरगोड तर आभारप्रदर्शन किरण सावंतण्णावर यांनी केले.









