पाठपुरावा करण्याची शिवेंद्रराजेंची ग्वाही,
प्रतिनिधी/ सातारा
बैलगाडी शर्यत ही शेतकऱयांच्या आवडीचा खेळ आहे. यामध्ये कुठेही बैलांना हानी होत नाही. राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, केंद्र शासनाकडेही विनंती करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून मागणी करणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, सातारा, जावली येथील शेतकऱयांनी त्यांच्याकडे बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा, अशी मागणी केली.
सुरुची बंगला येथे त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात बैलगाडी शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांना भेटून मागणी केली जाईल. या शर्यतींमध्ये शेतकरी वर्गच सहभागी होत असतो येथे कुणी व्यावसायिक सहभागी होत नाही. या शर्यतींचे ग्रामीण भागाशी एक वेगळं नाते असते. पेटा संस्थेने याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यती थांबल्या आहेत. तेव्हापासून शेतकरी या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी धडपड करत आहेत. परंतु राज्य शासनाने शर्यती सुरु करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बैलगाडी शर्यत संघटना आता आक्रमक झाली आहे. पुर्वी बैलगाडा शर्यती होत असे. पेटा संस्थेच्या याचिकेनंतर काही निर्णय झाले आहेत. त्यामुळे या शर्यती थांबल्या आहेत. बैलगाडी शर्यती या ग्रामीण भागाशी जोडलेला प्रकार आहे. बैलांना फार जपण्याचे काम शेतकरी करीत असतो. शेतकरी अशा शर्यती भाग घेतात. त्यामुळे शेतकरी वर्ग बैलांना आपल्या मुलांप्रमाणेच वाढवितो. तो काही बैलांवर अमानुष अत्याचार करीत नाही. बैलगाडी शर्यत ही मनोरंजनाची गोष्ट आहे. यात्रांमध्ये जसा तमाशा होतो तसेच या शर्यती होतात. हजारो लोक बैलगाडी शर्यती पाहयला यायची. हे एक आकर्षण असते. या ठिकाणी बक्षीसं लावलेली जात. सगळीकडं बैलांवर अत्याचार होतो असं नाही, कुठं तरी एखादी घटना घडली असेल पण सरसकट शर्यतींवर बंदी लागू करणे हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होईलच पण बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.








