प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाने 40 वर्षे पूर्ण झालेल्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांना नवीन संस्था उभारणीसाठी दीर्घमुदतीने बिनव्याजी कर्ज द्यावे, यासह विविध मागण्यांचे ठराव कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत करण्यात आले. शाहुपुरीतील जय अपार्टमेंट येथील फेडरेशनच्या कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन व करवीर तालुका इरिगेशन फेडरेशनची वार्षिक सधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष शहापूरे होते. प्रमुख उपस्थिती अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांची मुंबईतून ऑनलाईनद्वारे होते.
अहवाल वाचन सचिव मारुती पाटील यांनी केले. यंदाच्या महापूरामध्ये नुकसान झालेल्या पाणी पुरवठा संस्थांना नुकसान भरपाई द्यावी, उच्च व लघु दाब सह पाणी पुरवठा संस्थांना 1 रुपये 16 पैसे प्रति युनिट वीज दर कायम असावा, असे विविध मागण्यांचे ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील, शामराव पाटील, एस. ए. कुलकर्णी, सचिन जमदाडे, नंदकुमार देसाई, सखाराम चव्हाण, सागर पाटील, ज्ञानदेव पाटील, आनंदा कांबळे, आदी उपस्थित होते. तसेच सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे प्रतिनिधी जिह्यातून ऑनलाईनद्वारे सहभागी झाले होते. दत्तात्रय उगले यांनी आभार मानले.