आमदार नाईक यांचे सत्ताधारी आमदार म्हणून कार्य काय? : जि. प. सभापती सावी लोके यांचा सवाल : कळसुलीत अर्सेनिक अल्बम गोळ्य़ांच्या वाटपाचा जि. प.तर्फे शुभारंभ
वार्ताहर / कणकवली:
चौदाव्या वित्त आयोगाच्या ग्रा.पं. निधीच्या व्याजाची रक्कम मागे घेऊन ती शासनाने अर्सेनिक अल्बम गोळ्य़ांसाठी वापरली. या रकमेवर जि. प. व ग्रा.पं.चा अधिकार होता. तरीही सत्ताधारी आमदार म्हणून जिल्हय़ाला कोरोना उपाययोजनांसाठी एकही रुपयाचा निधी शासनाकडून न आणता श्रेयासाठी कणकवली तालुक्यात अर्सेनिक अल्बम गोळ्य़ांच्या वाटपाचा शुभारंभ करण्याचा स्टंट आमदार वैभव नाईक यांनी केला. आतापर्यंत राज्य शासनाने जि. प.ला एकही रुपया दिलेला नाही, असे प्रतिपादन जि. प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांनी केले.
कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अर्सेनिक अल्बम गोळ्य़ांच्या वाटपाचा शुभारंभ जि. प.मार्फत सौ. लोके यांच्या उपस्थितीत झाला. याच आरोग्य केंद्रात दोन दिवसांपूर्वी आमदार नाईक यांनी अर्सेनिक अल्बम गोळ्य़ांचे वाटप केले होते. त्यानंतर जि. प.मार्फत कणकवली तालुक्यात या गोळ्य़ांच्या वाटपाचा पुन्हा शुभारंभ करण्यात आला.
जि. प. सदस्या सायली सावंत, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्राr, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, कळसुली सरपंच साक्षी परब, शिरवल सरपंच महेश शिरवलकर, कसवण सरपंच सौ. तेली, शशिकांत राणे, गजानन शिंदे, सचिन पारधिये, शाम मोडक, संतोष गुरव, हेमंत वारंग, आत्माराम नार्वेकर, किशोर घाडीगावकर आदी उपस्थित होते.
आरोग्य कर्मचाऱयांचे कौतूक!
सौ. लोके म्हणाल्या, आमदार नीतेश राणे यांनी जिल्हय़ात कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून 10 लाख अर्सेनिक अल्बमच्या गोळ्य़ांचे स्वखर्चातून घरोघरी वाटप केले. त्या पुढील डोस नागरिकांना मिळावा म्हणून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आठही तालुक्यांत या गोळ्य़ा वाटप करण्यात येत आहेत. कोरोना विरोधातील लढय़ात आरोग्य विभाग व आशासेविकांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.
फार्मासीस्ट पद भरणार!
सौ. लोके म्हणाल्या, कळसुली येथील रिक्त फार्मासीस्ट पद भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आमदार नाईक यांनी ग्रा.पं.कडील व्याजाच्या परत घेतलेल्या पैशातून सरकारने हा निधी दिल्याचे भासविल्याचा प्रयत्न केला. श्रेयच घ्यायचे असेल, तर स्वत: योगदान द्या व मगच श्रेय घ्या. आतापर्यंत राज्य शासनाने जि. प.ला एकही रुपया दिलेला नाही. शाळांमध्ये क्वारंटाईन केलेल्या व्यवस्थेनंतर आता शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी जि. प. सोडियम हायपोक्लोराईड पुरविणार आहे. यात सरकारचा काहीच रोल नाही.
आरोग्य विभाग सतर्क राहून काम करतोय!
सौ. सावंत म्हणाल्या, गेल्या तीन महिन्यात जि. प.च्या सर्वच कर्मचाऱयांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. यापुढेही असेच काम करून कोरोनाला जिल्हय़ातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. डॉ. पोळ म्हणाले, कणकवली तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असले, तरी सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. आरोग्य विभाग सतर्क राहून काम करत आहे. अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्य़ांच्या माध्यमातून कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढण्यास निश्चितच मदत होईल.









