उड्डाणपुलाला लावले रात्री श्री.छ.प्रतापसिंह महाराजांचे नाव
प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजे जे बोलतात तेच करतात. त्यांची स्टाईल, त्यांचे चालणे, त्यांचे बोलणे यावर राज्यातील कित्येकजण फॅन आहेत. त्यांनी अभि के अभि म्हणत ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करुन धक्का दिला तर काल रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलाला श्री.छ.प्रतापसिंहराजे महाराज उर्फ दादा महाराज अशा नावाचा बोर्ड लावून पुन्हा दे धक्का दिला आहे. यावरुन येत्या काही दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील विविध उपक्रमांचे उद्घाटन होणार असल्याची शक्यता व्यक्त होत असून त्यापुर्वीच राजेंनी आपला गड आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी मोहिमा फत्ते करण्याचा सपाटा सुरु केला आहे.
खासदार उदयनराजे यांच्याच प्रयत्नातून ग्रेड सेपरटेरचे काम मंजूर झाले अन् ते काम पूर्णत्वास गेले. परंतु सध्या महाविकास आघाडीची सत्ता असल्याने आणि ते त्या सत्तेत नसल्याने त्यांच्या कामाचे श्रेय हे त्यांचे पारंपारिक शत्रु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे घेणार अशी शक्यता निर्माण झाली. त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत. तसेच काही विकास कामांची सातारा शहरातील उद्घाटनेही लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केलेल्या कामांचे श्रेय जावू नये म्हणून खासदार उदयनराजे यांनी त्यांची स्टाईल वापरण्यास सुरुवात केली. अचानकपणे पाहणी करायला म्हणून गेले अन् ग्रेड सेपरटेरचे उद्घाटनच केले. त्यानंतर त्यांनी नुकतीच दोन दिवसांपूर्वी मेडिकल कॉलेजच्या कामांची पाहणी केली. त्याही कामाचा शुभारंभ लवकरच करणार असल्याचे त्यांनी बोलताना जाहीर केले. खासदार उदयनराजे यांचे सातारकरांना अनपेक्षित असे धक्के पहायला मिळत आहेत. केलेल्या कामांचे श्रेय अन्य कोणाला जावू नये म्हणून ते एकेक मोहिमा फत्ते करुत चालले आहेत. त्यांचे कट्टर विरोधक राज्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे कधीही सातारा जिल्हा दौऱयावर येतील अन् विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटने करतील याची शक्यता गृहीत धरुन ही सगळी तारांबळ सुरु आहे.








