प्रतिनिधी / इस्लामपूर
पुरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा माजी खासदार राजू शेट्टी व वाळवा-शिराळ्यातील भाजपा नेते एकत्र आले.या मोर्च्याच्या आयोजनाची घोषणा शेट्टी यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव नाईक,इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह अन्य घटक पक्षाच्या नेत्यांनी संयुक्तपणे केली. शेट्टी यांनी अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क वाढवला होता.
त्यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून वर्णी लागणार व त्या यादीत नाव आहे. पण महाविकास आघाडीने दिलेला शब्द न पाळल्याने शेट्टी नाराज असल्याची चर्चा आहे. या मोर्चाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा सरकार विरोधी सर्वपक्षीय मोट बांधण्याचा वाळव्यातून प्रयत्न सुरु केला आहे. त्यातून ते पुन्हा भाजपाच्या जवळ चालले आहेत,असे दिसते.