प्रतिनिधी / कोल्हापूर
पूरग्रस्त सभासद शेतकऱ्यांना राजाराम कारखान्याच्यावतीने होत असलेली मदत पाहून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. प्रत्येक ठिकाणी नकारात्मकता शोधणाऱ्या विरोधकांची स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही ही प्रवृत्ती आहे. टीका करणाऱ्यांचे पालक आणि मालक सध्या सत्तेत आहेत, मंत्री आहेत. परंतु त्यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं. महापूर आल्यानंतर या पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना कसलीही तातडीची मदत केली नाही. उलट आम्ही मदत करत असताना त्यावर आक्षेप घेऊन स्वतःची कातडी वाचवायचा ते प्रयत्न करत आहेत असे म्हणत छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
2019 च्या महापुरावेळी भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना पूरग्रस्तांना तातडीने आवश्यक ती मदत केली होती. तेव्हा त्यावर आता प्रश्न उपस्थित करण्याऐवजी तुम्ही सरकार म्हणून काय केले, ते सांगा. अश्या कठीण परिस्थितीत अस्मानी संकटाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आधार देणे गरजेचे होते, हे लक्षात घेऊन छत्रपती राजाराम महाराजांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करणाऱ्या राजाराम कारखान्याने ऊस रोपे व बियाणे देण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर विरोधकांनी चोराच्या उलट्या… पद्धतीने कांगावा सुरू केला. याला कारणीभूत त्यांना उठलेला पोटशूळ आहे. यावर त्यांना रामबाण औषध सभासदच देतील.
कोरोनाच्या बाबतीतही एकीकडे त्यांचेच सरकार आवाहन करते की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वाटते तेव्हा नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि दुसरीकडे मंत्र्यांचे बगलबच्चे आम्ही जागरूकता निर्माण केल्याबद्दल आमच्यावर टीका करतात. हे संपूर्ण वागणे म्हणजे वैचारिक दारिद्र्याचं लक्षण आहे.
प्रत्येक कारखाना आपल्या सभासदाकारिता कालानुरूप नवनवीन हितकारक निर्णय व धोरण अवलंबत असतो. त्यानुसारच आपल्या कारखान्याने उस पुरवठा न केलेल्या सभासदाना देखील सभासद साखर 3 किलो वरून 5 किलो करण्याचा निर्णय घेऊन सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला लागणाऱ्या शेतकरी सभासदांना दिलासा देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला आहे. पण एकंदरीत आमच्या विरोधकांना अशा सभासदांना आम्ही दिलेली ही गोड साखर सुद्धा कडू लागत आहे. विचारांचा कडवटपणा साखरेत मिसळून या निर्णयाचा आणि निवडणुकीचा संबंध जोडण्याचा निरर्थक प्रयत्न त्यांनी करू नये. इथले सभासद सुज्ञ आहेत, ते अश्या आरोपांना बळी पडणार नाहीत.
शिवाय राजाराम कारखान्याने कै.भगवानराव पवार यांच्या नावाने ऊस विकास योजना सुरू केली. यावरही विरोधकांनी टीका केली आहे. ज्या व्यक्तीने कारखाना सहकारी व्हावा म्हणून प्रयत्न केले त्यांच्या नावाने योजना सुरू केल्याबद्दल सर्वच सभासदांनी समाधान व्यक्त केले असताना मात्र ज्यांना फक्त विरोधाला विरोध करण्यातच रस असतो अश्या मोजक्या लोकांनीच या विषयातही राजकारण केले आहे. जे टीका करत आहेत त्यांची पात्रता काय ? या लोकांनी बाजार समितीचाच बाजार केला. शेवटी तिथे प्रशासक नेमायची वेळ आली आणि आता ही लोकं राजाराम कारखान्यावर टीका करतात म्हणजे लबाडीची हद्दच झाली.
याच सगळ्या बोलघेवड्यानी आणि त्यांच्या नेत्यांनी सप्तगंगा साखर कारखान्याच्या सभासदांचा विश्वासघात करून कारखान्यावर डी.वाय.पाटील यांच्या नावाची पाटी लावून खाजगीकरणाकडे वाटचाल केली आहे. छ.राजाराम कारखान्यात योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान राखायची परंपरा आहे त्यामुळे कै.भगवानराव पवारांचं नाव या योजनेला देण्यात आलेलं आहे, तेव्हा याबाबत विरोधकांनी राजकीय रंग देऊन सभासदांची भूलवण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा डी.वाय पाटलांच्या ऐवजी सप्तगंगा साखर कारखान्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी खरंच मोलाच योगदान दिलं त्या बाळ पाटलांच नाव कारखान्याला देण्याची किमान नैतिकता तरी यांनी दाखवावी. असा ही टोला चेअरमन दिलीप पाटील यांनी लगावला आहे.