प्रतिनिधी / कोल्हापूर
राजाराम कॉलेजच्या वतीने राजाराम महोत्सव 25 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे. पाच दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कथाकार राजेंद्र प्रधान यांच्या खेंदुर या एकपात्री नाटय़प्रयोगाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमणर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार 25 रोजी दुपारी 1 वाजता महाविदयालयीन विद्यार्थ्यांचा कॅराओके, गायनाच्या स्पर्धा होणार आहेत. सोमवार 27 जानेवारी रोजी सकाळी 10 जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत वक्ते नितीन बनुगडे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता दागिने कसे बनवायचे , पेन्सील स्केच, फेस पेंटींग, काव्यवाचनाच्या कार्यक्रम. तसेच सायंकाळी 5 वाजता प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ‘निरोगी व सुदृढ मन’ या विषयावर निखिल गोटे यांचे व्याख्यान होईल. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांचा पारंपारिक लोकनृत्याच्या स्पर्धा होतील. सायंकाळी 5.30 वाजता ‘गाणी मनातली’ मराठी जुन्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार 29 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.यामध्ये गडहिंग्लजच्या केशकरतनकार शांताबाई यादव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पल्लवी देसाई, नर्सरी चालवणाऱया विजया पाटील यांचा समावेश आहे. तसेच नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस महानिरिक्षक हेमंत निंबाळकर, राज्याचे माजी पोलिस आयुक्त सुनील रामानंद, राज्य महसूल सचिव पितांबर भोसले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अभिनेता आनंद काळे, अभिनेत्री प्रांजल पालकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दुपारी 4.30 वाजता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाईल. या महोत्सवासाठी जवळपास 5 हजार आजी-माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. अनिता बोडके, माजी राजारामीयन हेमंत पाटील, रघुनाथ कडाकणे, शशिकांत पाटील, दिपक जमनीस आदी उपस्थित होते.









