वाहतुकीला अडथळा, महामार्ग ठेकेदार कंपनीचा मनमानी कारभार
वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील अर्जुना नदीवर वरचीपेठ येथे उभारल्या जाणाऱया सर्वाधिक उंचीच्या पुलामुळे अगोदरच राजापूर-शीळ चिखलगाव रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. त्यात भर म्हणून कंपनीने या मार्गावरच अतिक्रमण करीत संरक्षण भिंत उभारल्याने या मार्गावरील दुहेरी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या 2 वर्षापासून अर्जुना नदीवर सुरू असलेल्या महामार्गाच्या पुलाच्या उभारणीसाठी कोंढेतड बाजूने अनावश्यक भराव टाकण्यात आल्याने शिळ चिखलगाव मार्गाची मोठय़ा प्रमाणात धूप झाली आहे. ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या वरील बाजूने टेकडीला संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करत ही संरक्षण भिंत बांधल्यामुळे मुळातच अरूंद रस्ता आता जेमतेम एकेरी वाहतूक होईल एवढाच शिल्लक आहे. या विरोधात स्थानिक जनतेने आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.









