वार्ताहर/ राजापूर
राजापूर आगारातील एस.टी. कर्मचाऱयांना जून महिन्यापासून पगारच न मिळाल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला असताना पगार रखडल्याने चूल कशी पेटवायची अशा विवंचनेत कर्मचारी सापडले आहेत.
कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प असून त्याचा फटका सर्व उद्योग व्यवसायांना बसला आहे. एस.टी.वाहतूकीलाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये एस.टी.सेवा पूर्ण बंद असल्यामुळे एसटी विभागाला कोटय़ावधीचा फटका बसला आहे. दरम्यानच्या काळात ज्या जिल्हय़ात व तालुक्यात कोरोनाचा जास्त प्रभाव नव्हता. तेथे एस टीची सेवा टप्प्याटप्प्याने सुरु केली गेली मात्र ती सुरु करताना प्रत्येक सीटवर एकच प्रवाशाने बसावे यासह काही अटी ठेवण्यात आल्या. सद्यस्थितीत बसेस धावत असल्या तरी प्रवाशांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे पुढे आले आहे.
राजापूर आगारातील पंचवीस शेडय़ुलच्या 110 फेऱया सध्या सुरु आहेत. त्यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत आहेत तर उर्वरीत कर्मचाऱयांना रजा देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाच्या महामारीचा चांगलाच फटका राजापूरातील कर्मचायांना बसला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱयांच्या पगारावर कमालीचा परीणाम झाला आहे. फक्त एप्रिल महिन्यात संपुर्ण पगार कर्मचाऱयांना मिळाला आहे. तर मार्चमध्ये सोळा दिवस तर मे महिन्यात एकोणीस दिवसांचाच पगार देण्यात आला आहे. जूनपासून गेल्या दोन महिन्यात पगारच देण्यात आलेला नाही. त्यामुळे समस्त कर्मचारी हवालदील झाले आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. जर पगारच मिळाला नाही तर चुल कशी पेटवायची. असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. आता संबंधीत एसटी महामंडळ कर्मचाऱयांच्या पगाराबाबत कोणता निर्णय घेते त्याकडे सर्व कर्मचाऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.









