वार्ताहर/ राजापूर
तालुक्यात 2 दिवस मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर शहरात पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जवाहर चौक येथील पान टपऱयापर्यंत पाणी आले असून चिंचबांध, वरचीपेठ, शिळ रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, खेडमध्येही जगबुडी नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवासांपासून पडणाऱया दमदार पावसाने नद्या, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला. 2 दिवस मुसळधारेने कोसळणाऱया पावसामुळे शहरातून वाहणाऱया अर्जुना व कोदवली दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
कोदवली नदीच्या पुराचे पाणी जवाहर चौकातील पान टपऱयांपर्यंत आले होते. तर अर्जुना नदीच्या पुराचे पाणी गणेशघाट, नवजीवन हायस्कूल, चिंचबांध ते वरचीपेठ तसेच शिळ रस्त्यावर आल्याने शिळ, गोठणे-दोनिवडे, चिखलगाव या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. बुधवारी दुपारनंतरही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अर्जुनासह कोदवली नदीच्या पाण्यातही झपाटय़ाने वाढ होत होती. त्यामुळे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. पुराच्या शक्यतेने जवाहर चौक तसेच शिवाजीपथ मार्गावरील दुकानदारांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे.
खेडमध्ये जगबुडी पात्राबाहेर
खेडः तालुक्यात दुसऱया दिवशीही दमदार पावसाने झोडपून काढले. बुधवारी धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे जगबुडी व नारंगी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. सायंकाळनंतर जगबुडी नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने खेडमध्ये पुराचा धोका आहे.









