पुलवामा हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा अपमान केल्याचा आरोप
जयपूर / वृत्तसंस्था
चार वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झ्ा़लेल्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या कुटुंबियांचा राजस्थान सरकारकडून अपमान झाल्याचा आरोप करत भाजपने राज्यभर उग्र आंदोलनाला प्रारंभ केला आहे. या आंदोलनात महिलांचा सहभाग प्रामुख्याने आहे.
पुलवामा हुतात्म्यांच्या कुटुंबियांना राजस्थान सरकारने साहाय्य देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, चार वर्षे झाली तरी हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. राज्य सरकारच्या निषेधार्थ या कुटुंबियांनी राजधानी जयपूर येथे शुक्रवारी आंदोलन केले होते. मात्र राजस्थान सरकारच्या पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीमार केला. त्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या घटनेनंतर त्वरित भाजपच्या राजस्थान शाखेने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शनिवारी आंदोलनास प्रारंभ करण्पात आला आहे.
प्रचंड मोर्चा
राजधानी जयपूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मोर्चाचे आयोजन राज्य सरकारच्या निषेधार्थ केले होते. या मोर्चाला सर्वसामान्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. मोर्चात हजारो आंदोलन भर उन्हातही समाविष्ट झाले होते. मोर्चा यशस्वी झाल्याचे प्रतिपादन राज्य भाजपने नंतर केले. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेले भाजप नेते किरोडीमल मीना यांची भेट भाजपच्या राज्यशाखेचे अध्यक्ष राजेंद्र राठोड यांनी रुग्णालयात घेतली. मीना हे आंदोलन करणाऱया महिलांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना वाटेत अडवून पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.