प्रतिनिधी /पणजी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा शाखेतर्फे राजधानी पणजीतील जुन्या वैद्यकीय महाविद्यालयासमोर (ओल्ड जीएमसी) निदर्शने करुन राजस्थानातील डॉ. अर्चना शर्मा आत्महत्याप्रकरणी निषेध नोंदवला. त्यावेळी सर्व डॉक्टर्सनी काळी रिर्बन बांधली होती.
सदर डॉक्टरची आत्महत्या धक्कादायक असून तिच्यावर दबावातून एफआयआर नोंदविण्यात आला. शिवाय रुग्ण दगावला म्हणून त्याचा खून केल्याचे कलम तिच्यावर लावण्यात आले. हे सर्व राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप डॉ. शर्मा यांच्या कुटुंबियांनी केला अशी माहिती निदर्शने करणाऱया डॉक्टर्सनी दिली. रुग्णावर उपचार करुन त्यास वाचविण्याचे प्रयत्न डॉक्टर्स मंडळी करतात परंतु काही वेळा रुग्ण दगावतो. त्यास डॉक्टर जबाबदार असतातच असे नाही. अशा प्रकरणात रुग्णांच्या नातेवाईकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे तथापि, त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे, असेही डॉक्टर्सनी निदर्शनास आणले.
असोसिएशनचे एक सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, अशी प्रकरणे सोडविण्यासाठी सरकारने समिती नेमावी आणि ती प्रकरणे त्या समितीकडे द्यावीत. त्या समितीने शिफारस केल्यानंतरच एफआयआर नोंद करण्यात यावा. त्यासाठी अशी समिती राज्य सरकारने त्वरित नेमावी, अशी मागणी डॉ. साळकर यांनी केली.









