संरक्षण साहित्याच्या शीघ्र पुरवठय़ाचा मुद्दा चर्चेत
वृत्तसंस्था/ मॉस्को
भारत-चीन तणावादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सोमवारी तीन दिवसीय दौऱयाकरता रशियात पोहोचले आहेत. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण क्षेत्र आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तसेच भारत एस-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी रशियावर दबाव आणू शकतो.
चीन आणि भारत यांच्या सैनिकांदरम्यान हिंसक झटापटीच्या 6 दिवसांनी राजनाथ सिंग यांचा हा दौरा होत आहे. 15 जून रोजी झालेल्या झटापटीत गलवान खोऱयात 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. तर चीनचे 43 सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.
विमानाने पुरवठा व्हावा
सुखोई-30 एमकेआय, मिग-29, टी-90 रणगाडा आणि किलो क्लास पाणबुडीसाठी उपकरणांचा तातडीचा पुरवठा करण्याची मागणी राजनाथ सिंग रशियाकडे करणार आहेत. यापूर्वी या उपकरणांचा पुरवठा सागरी मार्गाने होणार होता, परंतु कोविड महामारीमुळे हा पुरवठा अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहिला आहे. विमानाद्वारे या उपकरणांचा लवकरात लवकर पुरवठा केला जावा असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रशियाला सांगणार आहेत.
विजय दिन संचलनात सामील
भारत-रशिया यांच्यातील संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्यासंदर्भात या दौऱयात चर्चा होणार आहे. मॉस्कोमध्ये 75 व्या विजय संचलन दिनातही सामील होणार असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी ट्विट करत सांगितले आहे. राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण सचिव अजय कुमार हे देखील दौऱयावर गेले आहेत.
तणावाची माहिती देणार
कोरोना संकटामुळे रशियाने एस-400 सुरक्षा यंत्रणा डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करणार असल्याचे कळविले आहे. भारताने मागील वर्षीच या यंत्रणेसाठी रशियाला 40 हजार कोटी रुपये दिले आहेत. चीनसोबतच्या सीमेवरील तणावासंबंधी राजनाथ सिंग रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांना माहिती देणार आहेत. तर या दौऱयात राजनाथ यांची चिनी अधिकाऱयांशी कुठलीच चर्चा होणार नाही. तर कोरोना महामारीदरम्यान कुठल्याही भारतीय मंत्र्याचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.









