प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यासाठी सुसज्ज असे क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातून केली जात होती. अखेर या मागणीला यश येत असून लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नाने लवकरच क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. लांजा तहसील कार्यालय येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
लांजा तालुक्याचे क्रीडा संकुलाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी तालुका प्रशासनाच्या सर्व अधिकार्यासमवेत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा क्रीडा विभागाचे किरण बोरवडेकर उपस्थित होते. यावेळी लांजा प स. सभापती लीला घडशी, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, तहसीलदार तथा क्रीडा संकुल समिती कार्याध्यक्ष समाधान गायकवाड , गटविकास अधिकारी यशवंत भांड, सार्वजनिक बांधकाम अधिकारी राजेंद्र कुलकर्णी, गटशिक्षण अधिकारी डी बी स्वपनूर, बागडी, भागवत आदी उपस्थित होते.
तालुका तिथे क्रीडा संकुल अशी शासनाचे धोरण लक्षात घेऊन आमदार साळवी हे लांजाचा प्रलंबित प्रन्न मार्गी लावणार आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत तालुक्याच्या क्रीडा संकुलाबाबी सविस्तर चर्चा करून संकुल उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे लांजा तालुक्याचे क्रीडा संकुल लवकरच उभे राहणार असून तालुक्यातील खेळाडूंची क्रीडा संकुलाची मागणी पूर्णत्वाला जाणार आहे.
दरम्यान गेली अनेक वर्षापासून लांजा तालुक्यासाठी क्रीडा संकुल उभारावे अशी मागणी करण्यात आली होती.मात्र जागेअभावी हा क्रीडा संकुलाचा विषय मागे पडून राहिला होता.त्यावेळीही आमदार साळवी यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले होते.
जागाच मिळत नसल्याने संकुलाच्या विषय थांबला होता. मात्र पुन्हा एकदा आमदार राजन साळवी हे क्रीडा संकुलासाठी आग्रही झाले असून लांजासाठी हा विषय मार्गी लावणार आहेत. या आधीही आमदार साळवी यांनी लांजा सीनियर कॉलेज येथील जागा, कुरणे, देवराई, भांबेड या गावांमधील जगाबाबत चर्चा केली होती. जागा मिळत नसल्याने संकुलाचा प्रश्न अधांतरी राहिला होता. त्यावेळी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र ततालुक्यात अनेक ठिकाणी जागा पाहण्यात आली. जागाच मिळत नसल्याने हा विषय स्थगित राहिला होता.
क्रीडा संकुला बाबत मंगळवारी झालेल्या बैठकीमुळे तालुक्यातील खेळाडूंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या झालेल्या बैठकीमध्ये लांजा नगरपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या कुवे गावामध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर १ या ठिकाणी ७४ गुंठे जागा असून या जागेपैकी १० गुंठे जागा शाळेसाठी राखून ठेऊन उर्वरित जागा क्रीडा संकुलासाठी वापरण्यात यावी असे चर्चेमध्ये ठरले. आमदार राजन साळवीसह जिल्हा क्रीडा विभाग व तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यानी जागेची प्रत्यक्ष कुवे येथे जाऊन पाहणी केली. त्यामुळे लवकरच लांजा तालुक्याचा क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लागणार आहे.









