‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ ने उघडणार पडदा : केंद्रीयमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्याहस्ते उद्घाटन, 95 देशातील 624 चित्रपटांची मेजवानी

प्रतिनिधी /पणजी
नेत्रदीपक रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, आकर्षक कलाकृती, मनभावक मयुररुपी बोधचिन्ह, विविध ठिकाणी उभारण्यात आलेली दिलखेचक प्रवेशद्वारे, कमानी यांच्या साक्षीने आजपासून पणजीत मायानगरी अवतरणार आहे. त्यानंतर पुढील 9 दिवस देशविदेशी सिनेरसिक, दिग्गज सितारे, असंख्य अन्य चित्रपट कलाकार यांची रेलचेल पणजीत दिसणार आहे. कार्लोस सौरा दिग्दर्शित ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ या चित्रपटाने भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा उघडणार आहे.
या महोत्सवात इस्तेवान स्झाबो व मार्टिन स्कोर्सेस यांना ’सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ तर प्रसिद्ध सिनेतारका ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना ’इंडियन फिल्म पर्सनालिटी ऑफ द इयर 2021’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
ताळगाव पठारावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजता होणाऱया शानदार सोहळ्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान, रणबीर सिंह, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, मॉनी रॉय आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. करण जोहर आणि मनिष पॉल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.
गतवर्षीप्रमाणेच यंदाचा इफ्फीही हायब्रिड पद्धतीनेच होणार असून 95 देशातील 624 चित्रपटांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. त्यात पाच ब्रिक्स देशातील 202 चित्रपटांचा समावेश असून 12 वर्ल्ड प्रीमियर, 7 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 26 आशिया प्रीमियर आणि 64 भारतीय प्रीमियर होणार आहेत. त्याशिवाय 18 क्युरेटेड चित्रपटांचा समावेश असेल. यातील 40 ते 45 चित्रपट ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात येणार आहेत. ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने शुभारंभ आणि ’द हिरो’ चित्रपटाने आंचिमचा समारोप होणार आहे.
इफ्फीसाठी रु. 25 कोटीहून अधिक खर्च गोवा राज्यात सुरू होत असलेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी रु. 25 कोटीहून अधिक एवढा प्रचंड खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारतर्फे रु. 16 ते 18 कोटी खर्च होणार असून केंद्र सरकार रु. 10 कोटी देणार आहे. दोन्ही खर्च मिळून एकूण खर्च रु. 25 कोटीच्या वर जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या महोत्सवाकरीता एवढी मोठी रक्कम पाण्यासारखी खर्च करणे खरोखरच गरजेची आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.









