गौरी आवळे / सातारा :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या महिला आघाडीचे खंबीर नेतृत्त्व जिल्हाध्यक्षा सोनालीताई जितेंद्र शिंदे यांची राजकारणात भक्कम वाटचाल सुरू आहे. अन्यायाला वाचा फोडत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आवाज बुलंद केला आहे. त्यांचा हा आवाज तळागाळातील महिलांना सक्षम करत आहे. सोनाली जितेंद्र शिंदे यांचे मामा किशोर धुमाळ यांना राजकारणासह सामाजिक कार्याची आवड होती. मामाच्या छत्रछायेखाली सोनालीताईंची वाटचाल सुरू झाली. मामाचा सामाजिक, राजकीय वारसा त्यांनी पुढे नेण्याचे ठरवले. 2009 साली मुंबईतील नालासोपारा येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला. आणि त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. मुंबईतील समस्यांवर त्यांनी काम केले. आंदोलन, मोर्चा काढणे, महिलांना रोजगार मिळवून दिला. 2013 साली त्यांचे लग्न झाले आणि त्या साताऱ्यात आल्या.
साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी राजकीय प्रवास सुरू ठेवत 2014 साली मनसेचे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारले. पदभार घेताच त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचे धोरण पुढे ठेवले. महिलांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवल्या. त्यांना रोजगारांच्या नव्या संधी मिळवून दिल्या. शासनाच्या योजनाची माहिती देत त्या योजना लागू करून दिल्या. कमी वेळेत त्यांचे काम जिह्याच्या कानाकोपऱयात पोहचले. तळागाळातील पिडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सदैव ढाल बनून उभ्या असतात. राजकारणासह त्यांनी सामाजिक कार्यातही आपली ओळख निर्माण केली आहे. शहरातील रस्त्याची कामे, पाणी प्रश्न सोडवले. नागरिकांना सोयी-सुविधा देण्याची मागणी केली.
सोनालीताई आरोग्य, नेत्र तपासणी शिबिर राबवतात. तसेच गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करतात. त्यांच्या सामाजिक, राजकीय प्रवासात आई स्व. सुमन जितेंद्र शिंदे यांची मोठी साथ मिळाली. त्यांना घडवण्यात आईचे मोठे योगदान आहे. त्यांची आई त्यांच्या यशाची सावली आहे.
महिलांनी धडाडीने राहिले पाहिजे…
आज समाजात महिला तसेच मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या घटना नुसत्या बघत बसायच्या नाहीत तर त्यातून महिलांनी धडाडीने राहिले पाहिजे. कोणी तुमच्याकडे तिरक्या नजरेने बघण्याची हिंमत केली तर त्याला योग्य धडा शिकवता आला पाहिजे. आता सक्षम होण्याबरोबर खंबीर होवून लढता आले पाहिजे. कोणतीही अडचण आली तर मला आवाज द्या मी नेहमी तुमच्या सोबत असणार आहे.
-सोनाली जितेंद्र शिंदे,
जिल्हाध्यक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना