राज्यसभेच्या 5 खासदारांकडून ‘खोट्या स्वाक्षरी’चा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत सोमवारी संमत झाले होते. हे विधेयक संमत होताच आप खासदार राघव चड्ढा एका मोठ्या वादात सापडले आहेत. राज्यसभेच्या 5 खासदारांनी आप खासदाराच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे.
दिल्ली सेवा विधेयकावर प्रस्तावित निवड समितीकरता बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचा आरोप 5 खासदारांनी केला आहे. यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी तक्रारीवर चौकशी करण्याची घोषणा केली आहे. विधेयकाच्या पडताळणीसाठी राज्यसभेत राघव चड्ढा यांनी निवड समितीचा प्रस्ताव मांडला होता.
विशेषाधिकार समितीने नोटीस बजावल्यावर मी माझा जबाब मांडणार असल्याचे चड्ढा यांनी म्हटले आहे. प्रस्तावित निवड समितीत सहमतीशिवाय नाव समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे एस. फांगनोन कोन्याक, नरहरि अमीन आणि सुधांशु त्रिवेदी, अण्णाद्रमुकचे एम. थंबीदुराई आणि बीजदचे सस्मित पात्रा सामील आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चौकशीची मागणी
उपसभापतींनी प्रस्तावित निवड समितीत सामील केल्या जाणाऱ्या खासदारांची नावे वाचली होती. आप खासदाराकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात संबंधित खासदारांच्या स्वाक्षरीशिवाय त्यांची नावे सामील करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविले जावे. खासदारांच्या नावावर कुणी स्वाक्षरी केली हा चौकशीचा विषय असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
चड्ढा यांच्यावरील आरोप
वायएसआर काँग्रेसच्या एका खासदाराचे नाव चड्ढा यांनी त्यांच्या सहमतीशिवाय प्रस्तावात सामील केले होते असा आरोप वायएसआर काँग्रेसचे खासदार विजय साई रे•ाr यांनी केला आहे. 6 वर्षांपासून मी मंत्री म्हणून काम करत आहे. तसेच 30-40 वर्षांपासून संसदेचे कामकाज पाहत आहे, तसेच एक नागरी सेवक म्हणूनही काम केले आहे, यापूर्वी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता, यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेतले जावे असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे.









