रामतीर्थनगरमध्ये मूळ मालक-नागरिकांनी बांधलेल्या इमारतेंवर बुडाची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्यावतीने राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली होती. सदर जागा आंबेडकर निगमकरिता मंजूर करण्यात आल्याने जागेचा ताबा देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर बुडाने जागेत बांधण्यात आलेली घरे हटविण्याची कारवाई मंगळवारी केली.
रामतीर्थनगर वसाहत निर्माण करताना नागरी हितासाठी काही ठिकाणी जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सदर जागांवर मूळ मालकांनी व अन्य नागरिकांनी इमारती बांधल्या होत्या. सातत्याने सूचना करूनही इमारती हटविण्यात आल्या नव्हत्या. तसेच बुडाने राखीव ठेवलेल्या जागा विविध संघटना आणि राज्य शासनाच्या शाखांना मंजूर केल्या होत्या. यापैकी काही जागा आंबेडकर निगमसाठी मंजूर करण्यात आली होती. पण सदर जागेवर इमारत असल्याने जागेचा ताबा देण्यास अडचण निर्माण झाली होती. याबाबत मूळ मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण सदर जागेचे भूसंपादन करण्यात आल्याने अतिक्रमण हटविण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही जागेवरील इमारती हटविण्यात आल्या नव्हत्या. बुडाच्या अधिकाऱयांनी इमारतधारकांशी चर्चा करून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना केली होती. तरीदेखील न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे बुडाच्या अधिकाऱयांनी इमारतधारकांची भेट घेऊन इमारती हटविण्याची सूचना केली होती. पण कोणीही इमारती हटविल्या नसल्याने मंगळवारी बुडाच्यावतीने या इमारती हटविण्याची कारवाई राबविण्यात आली.
यावेळी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, अधीक्षक अभियंते एस. सी. नाईक, साहाय्यक कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ, कामत व बुडाचे इतर अधिकारी उपस्थित होते.









