ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात भागिदारी आहे. त्यामुळे राऊत राज्य सरकारच्या मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाईन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार आहेत. अशोक गर्ग हे 2006 पासून वाईन उद्योग चालवतात. 2010 मध्ये त्यांनी आणखी एक कंपनीन सुरु केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हा वाईन वितरीत करणे हा आहे. राऊत यांच्या परिवाराने 16 एप्रिल 2021 मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. या कंपनीची 100 कोटींची वार्षिक उलाढाल त्यांची होते. 12 जानेवारी 2022 रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती कंपनी मंत्रालयाला दिली. या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅक पी, असे ठेवण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
वाईन उद्योगात गुंतवणूक असल्यानेच संजय राऊत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. वाईन म्हणजे दारु नव्हे, असा युक्तिवाद ते करत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये मी संजय राऊत यांच्या आणखी एका व्यवसायाचे तपशील जाहीर करेन, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.