प्रतिनिधी / कराड :
शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलीस आणि नगरपालिका पदाधिकाऱयांच्या आजपर्यंत झालेल्या बैठकींची अपवाद वगळता अंमलबजावणी झालेली नाही. यातच गुरूवारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि नगरसेवकांची आणखी एक सुमारे दीड तासांची बैठक पार पडली. वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आणण्यासाठी पाच महत्त्वाच्या मुद्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. 15 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीला अडथळा करणारे रस्त्यालगतची व फुटपाथवरील अतिक्रमण कायमचे हटवण्यावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान ज्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे, त्या ठिकाणी शंभर मीटर अंतरापर्यंत नो-पार्किंग झोन करण्यात येईल. तेथील सर्व रिक्षा थांबे हटवण्यावरही बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, विजय वाटेगावकर, विरोधी गटनेते सौरभ पाटील, हणमंत पवार, स्मिता हुलवान, आशा मुळे, जयंत बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका हा शहरातून जाणारा गुहागर-पंढरपूर राज्यमार्ग आहे. शहरात या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. वाहतुकीला अडथळा करणारी अतिक्रमणे फुटपाथवर आणि रस्त्यालगत झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. यावर बैठकीत चर्चा झाली. जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या, अतिक्रमण कायमचे काढून टाकण्याची गरज असून अतिक्रमणाचा दंड कमी असल्याने त्याचा फारसा फरक अतिक्रमण करणारावर पडत नाही. यावर नगराध्यक्षा शिंदेंसह नगरसेवकांशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार 3 फेब्रुवारीपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याचा निर्णय झाला. त्यापूर्वी रस्त्यालगत ज्यांचे अतिक्रमण आहे, त्या सर्वांना नोटीस बजावण्यात येणार आहे. अतिक्रमण काढताना जप्त केलेले हातगाडे, स्टॉल परत मिळणार नाहीत, असाही निर्णय झाला.









