रविवारचा लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी, शहर परिसरात शुकशुकाट
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी रात्री 9 ते सोमवारी सकाळी 5 असा सलग 32 तासांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चौथ्या रविवारीही आठवडाभरानंतर पुन्हा एकदा शहर थांबले. रस्ते निर्मनुष्य होते. नेहमी गजबजलेले चौक व गल्ल्या शांत होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प होते. कोरोनाच्या भीतीमुळे शहर व परिसरात शुकशुकाट होता. असे चित्र रविवारी बेळगावमध्ये पहावयास मिळाले.
बेळगाव जिल्हय़ामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने जिल्हय़ातील नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची धास्ती वाढली आहे. बेळगाव शहराबरोबरच उपनगर व तालुक्मयामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद करून घरात राहणे पसंत केले. बेळगावकरांच्या दिवसाची सुरूवात ही मॉर्निंग वॉकने होते. परंतु रविवारी मात्र नेहमी मॉर्निंग वॉकसाठी गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. ना बाजारपेठेत विपेत्यांचा गोंगाट, वाहनांचे हॉर्न, ना लोकांची धावपळ. यामुळे 100 टक्के लॉकडाऊन यशस्वी करण्यामध्ये बेळगावकर यशस्वी ठरले.
उपनगरांमध्येही शुकशुकाट
बेळगाव शहराबरोबरच उपनगरांमध्येही कोरोनाची धास्ती वाढल्यामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होते. अनगोळ, टिळकवाडी, शहापूर-वडगाव, जुनेबेळगाव, उद्यमबाग, सदाशिवनगर, वीरभद्रनगर, आझमनगर, शाहूनगर, गांधीनगर, अंजनेयनगर, ऑटोनगर परिसरात शांतता होती.









