प्रतिनिधी / सांगली
येथील वखारभागातील रस्तेकामावरून आयुक्त नितीन कापडनीस व उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्यात वाद रंगला आहे. सूर्यवंशी यांच्या प्रभागातील हे 64 लाख रुपयांचे रस्तेकाम आहे. त्या कामाची फाईल स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही कापडनीस यांनी रोखली आहे. हा विषय महासभेच्या अखत्यारीत असल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांनी हा विषय 20 जानेवारीला होणार्या महासभेकडेही मान्यतेसाठी पाठविला आहे. पण त्याच निकषानुसार शासन निधीतील 100 कोटी रुपयांतील इतर कामांसह सर्वच 50 लाखांच्या कामांना हेच निकष का लावले नाहीत, असा पवित्रा घेतला आहे. यावरून महासभेत याचे पडसाद उमटणार आहेत.
महापालिकेत आर्थिक आणीबाणीची परिस्थिती आहे. येथे भाजपची सत्ता आहे. परंतु राज्यात सत्तांतर होऊन विकास महाआघाडी सत्तेवर आली आहे. त्यामुळे शासनाकडून महापालिकेची आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आयुक्त कापडनीस यांनी अनेक विकासकामांच्या फाईल अडविल्या आहेत. यातून नगरसेवक व प्रशासन असा संघर्ष रंगला आहे. त्यातच काही सत्ताधारी पदाधिकार्यांतही प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे. याला भाजपमधील अंतर्गत गटबाजीची किनार आहे.
दरम्यान, सूर्यवंशी यांच्या प्रभागातील महावीरनगर जैन मंदिर ते कोठारी घर ते जुनी वसंतदादा बँक इमारत, जगवल्लभ पतसंस्था ते साई कॉम्प्लेक्स, जैन बोर्डिंग ते प्रताप टॉकिज अशा हॉटमिक्स रस्ते काम मंजूर झाले आहे. हे 64 लाख रुपयांचे काम असून, अंदाजपत्रकीय दरापेक्षा 0.91 टक्के कमी दराने स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आले आहे. त्याच्या दर मान्यतेवरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर अंतिम स्वाक्षरीने अंमलबजावणीसाठी कापडनीस यांच्याकडे फाईल पाठविण्यात आली आहे. परंतु कापडनीस यांनी 50 लाखांच्या वरील निर्णयाचे अधिकार महासभेला असल्याने असल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे तेथे हा विषय पाठविण्याची शिफारस केली आहे.
यावरून सूर्यवंशी यांनी वाद न घालता या विषयाचे विषयपत्र तयार करुन तत्काळ 20 जानेवारीच्या महासभेकडे मान्यतेसाठी फाईल पाठविली आहे. पण या रस्तेकामास हा निकष असेल तर यापूर्वी 50 लाखांच्या वरील विषय महासभेत न आणता प्रशासन व स्थायी समितीने मंजूर केले कसे, असा सवाल उपस्थित केला आहे. यामध्ये नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. मिरजेतील 13 कोटी रुपये खर्चून भाजीमंडई उभारण्यात येणार आहे. सांगलीतील भाजीमंडई नूतनीकरणासह रस्तेकामे व अन्य 50 लाखांच्या वरील कोटय़वधी रुपयांचे विषय आहेत. ते सर्व महासभेकडे पाठवावेत असा सूर्यवंशी यांच्यासह अनेक नगरसेवकांनी पवित्रा घेतला होता. तरीही तत्कालिन व विद्यमान आयुक्तांनी त्याची आवश्यकता नाही असा पवित्रा घेतला होता. त्यावेळी हा निकष कुठे गेला, असा सूर्यवंशी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
यामुळे आतापर्यंत कोटय़वधी रुपयांची महासभेच्या परस्पर झालेली स्थायी व प्रशासनाची कामे बोगस व बेकायदा आहेत असा त्यांनी पवित्रा घेतला आहे. सूर्यवंशी यांनी त्यांचा 64 लाख रुपये रस्तेकामाचा विषय अजेंडय़ावर आणून त्या वादाला तोंड फोडण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ते पीठासनावरून खाली उतरत पंचनामा करणार आहे, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हा विषय महासभेत एकूणच सर्वच गैरकारभाराचा पंचनामा करणारा ठरणार आहे. यासह शहरात टाकलेल्या मोबाईल केबल्सबद्दल जागाभाडे घेण्याचा विषय महासभेसमोर आहे.
हिराबाग येथील धोकादायक इमारत पाडणार
हिराबाग वॉटरवर्क्स येथील पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाच्या कार्यालयाची इमारत धोकादायक बनली आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले होते. त्यानुसार ती इमारत पाडण्याचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. येथील जलशुद्धिकरण केंद्र बंद आहे. त्यातच तेथील कार्यालयेही महापालिकेच्या मंगलधाम संकुलात हलविण्यात आली आहेत. त्यामुळे येथील साडेसहा एकर रिकाम्या जागेत महापालिकेचे मुख्यालय उभारावे अशी मागणी आहे. काहीजणांनी उत्पन्नवाढीसाठी तेथे व्यापारी संकुल उभारावे अशीही मागणी केली आहे. त्यामुळे या निमित्ताने अनेक विषयांना तोंड फुटणार आहे.








