महापालिका डांबराचे प्रमाण तपासणीसाठी चार मशिन घेणार, कामावर देखरेखीसाठी प्रायव्हेट एजन्सी नेमणार, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचीही घेणार मदत
प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील खराब झालेल्या रस्त्यावरून महापालिका प्रशासनाला टिकेला सामोरे जावे लागत आहे. येथून पुढे तरी करण्यात येणाऱया रस्त्यांची अवस्था अशी होऊ नये म्हणून दक्षता घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून रस्त्याचे काम सुरू असतानाच आता वॉच ठेवला जाणार आहे. डांबराच्या प्रमाणाची तपासणी होणार असून चार अत्याधुनिक मशिन खरेदी केली जाणार आहेत.
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अतिवृष्टीमुळे यामध्ये भरच पडली. सुस्थितीमध्ये असणारे रस्तेही खराब झाले. परिणामी `रस्ता कमी आणि खड्डे जास्त’ अशी स्थिती शहरातील बहुतांशी ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. दर्जेदार रस्ते केले नसल्यामुळेच ही स्थिती झाल्याचा आरोप सामाजिक संघटना, पक्षाच्यावतीने होत आहेत. यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुदतीनंतर खराब झालेले रस्त्यांचे पॅचवर्क तर मुदतीमध्ये खराब झालेले रस्ते ठेकेदाराकडून नव्याने करून घेतले जाणार आहे.
रस्त्याच्या कामावेळीच डांबर तपासणी
डांबराचे प्रमाण कमी असल्यामुळेच रस्ते निकृष्ट दर्जाचे होतात. त्यामुळे महापालिका डांबराचे प्रमाण तपासणारे अत्याधुनिक अशी चार मशिन खरेदी करणार आहे. प्रत्येक वॉर्ड ऑफीसला एक याप्रमाणे चार मशीन घेणार असून कामाच्यावेळीच मशिनने डांबराच्या प्रमाणाची तपासणी केली जाणार आहे.
39 कोटींचे रस्ते दर्जेदार करा
शहरात यापूर्वी केलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात चाळण झाली आहे. किमान येथून पुढे तरी करणारे रस्ते दर्जेदार व्हावेत, अशी मागणी जोर धरत आहे. शहरातील रस्त्यांसाठी 39 कोटींचा निधी मिळाला आहे. महापालिकेने हे रस्ते दर्जेदार करणे गरजेचे आहे.
खासगी एजन्सीची नेमणूक
रस्त्याचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाते. मात्र, काम झाल्यानंतर रस्त्याची तपासणी होते. आता काम सुरु असतानाच तपासणी करण्यासाठी प्रायव्हेट एजन्सी नेमण्याच्या तयारीत महापालिका आहे. एजन्सी रस्त्याची काम सुरू असतानाच तपासणी करणार आहे.
प्रशिक्षणार्थी अभियंता घेणार
आता रस्त्याच्या कामावेळीच वेगवेगळÎा पातळीवर वॉच राहणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी अभियंत्रा म्हणून महापालिकेत घेतले जाणार आहे. या अभियंतांना काम केल्याचे प्रमाणपत्र देणार आहे.
नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका