31 टक्के महाग : एक किलो साखर मिळविणेही अवघड
रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांवर दिसून येत आहे. युक्रेनमध्ये लोक जीव वाचविण्यासाठी देश सोडत आहेत, तर रशियात निर्बंधांमुळे महागाई वेगाने वाढली आहे. रशियात साखरेचे दर 31 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. अनेक दुकानांमध्ये साखर खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
एका सुपरमार्केटमध्ये साखर खरेदीसाठी लोकांमध्ये झटापट घडली आहे. येथे साखरेसाठी लोकांमध्ये वाद आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत लोक शॉपिंग कार्टमधून साखर घेण्यासाठी धक्काबुक्की करताना दिसून येतात. रशियातील या स्थितीसाठी राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन जबाबदार असल्याचे अनेक युजर्सनी म्हटले आहे.
युक्रेनवर हल्ल्यानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. यामुळे रशियाच्या अनेक दुकानांमध्ये एका ग्राहकासाठी केवळ 10 किलो साखर खरेदी करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. याचमुळे अशाप्रकारच्या घटना घडत असल्याचे मानले जात आहे.
दोन आठवडय़ांमध्ये रशियात साखरेची टंचाई निर्माण झाली आहे. तर देशात साखरेची टंचाई नसून काही व्यापारी साठेबाजी करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. रशियाने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जगभरातून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रशियात साखर 31 टक्के महाग झाली आहे. अन्य अनेक उत्पादने देखील महाग होत चालली आहेत. देशात कार, घरगुती सामग्रीसह टीव्हीची किंमत मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. वाढत्या किमती रोखण्यास सरकार आतापर्यंत अपयशी ठरले आहे.









