पतीला घातल्या गोळय़ा, मुलांसमोर महिलेवर बलात्कार
युक्रेनच्या एका महिलेवर कथितरित्या अनेकवेळा बलात्कार करण्यात आला आहे. या क्रौर्यादरम्यान तिच्या पतीची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. तसेच मुलांच्या समोरच महिलेवर हे क्रौर्य करण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या खासदार मारिया मेजेंटसेवा यांनी एका मुलाखतीत केला आहे.
यापूर्वी देखील युक्रेनमध्ये काही महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कीव्ह येथे राहणाऱया महिलेवर तिच्या मुलांसमोरच रशियाच्या सैनिकांकडून बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आम्ही शांत बसणार नाही. स्वतःच्या आईवर बलात्कार होताना पाहून या मुलांवर काय बेतले असेल असे म्हणत मेजेंटसेवा यांनी याप्रकरणी न्याय मिळवून देणार असल्याचे नमूद केले आहे. युक्रेनच्या प्रॉसिक्युटर जनरल इरिना वेनेदिक्तोव्हा यांनीही याप्रकरणी तपास करणार असल्याचे म्हटले आहे.
महिलेच्या घरात शिरलेले रशियाचे सैनिक हे मद्यपान करून आले होते. प्रथम त्यांनी महिलेच्या पतीची हत्या केली, मग वारंवार महिलेवर बलात्कार केला. याचबरोबर या सैनिकांनी मुलांनाही धमकाविले आहे. दोन सैनिकांनी यापूर्वी कीव्हच्या ब्रोवरीमध्ये महिलांवर हल्ला केला होता. मागील आठवडय़ात इरपिनमधून पलायन केलेल्या एका महिलेने रशियाचे सैनिक महिलांवर बलात्कार करत असल्याचा आरोप केला होता. अनातासिया तरान नावाची 30 वर्षीय महिला इरपिनमध्ये रशियाच्या हल्ल्यापूर्वी वेट्रेस म्हणून काम करत होती.









