थेट प्रसारणात रशियन पत्रकाराने दाखविला ‘स्टॉप वॉर’चा बॅनर : दुष्प्रचारावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन
रशियाच्या एका महिलेच्या साहसाचे जगभरात कौतुक होतेय. ही महिला निदर्शक रशियाच्या सरकारी टीव्ही नेटवर्क चॅनेल वनच्या थेट वृत्तप्रसारणादरम्यान शिरली आणि राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धावर जोरदार टीका केली आहे. दुष्प्रचारावर विश्वास ठेऊ नका, सरकार खोटं बोलतेय. युद्ध तत्काळ बंद करण्यात यावे असे या महिलेने थेट प्रसारणादरम्यान म्हटले आहे.
युद्ध बंद करा, युद्धाला नाही म्हणा असे या महिलेने ओरडून म्हटले. महिलेने स्वतःच्या हातात एक फलक धरला होता, ज्यावर ‘दुष्प्रचारावर विश्वास ठेवू नका, सरकार जनतेला खोटी माहिती देतेय’ असे नमूद होते. महिलेचा हा विरोध प्रसारित होताच जगभरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मानवाधिकार गटांनी टीव्ही स्टुडिओत शिरलेल्या या महिलेची ओळख मरिना ओवस्यान्निकोव्हा यांच्या स्वरुपात केली आहे.
ही महिला वन चॅनेलमध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे. महिलेला रशियाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे मानवाधिकार गटांनी म्हटले आहे. ओवस्यान्निकोव्हा यांनी यापूर्वी एक व्हिडिओ रिकॉर्ड केला होता. यात त्यांनी वन चॅनेलमध्ये काम करत असल्याबद्दल लाज वाटत असल्याचे नमूद केले होते. युक्रेनमध्ये जे काही घडतेय ते गुन्हा आहे. दुर्देवी बाब म्हणजे मी चॅनेल वनमध्ये काम करत आहे, रशियाचे राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिनच्या दुष्प्रचारावर काम करतेय असे त्यांनी म्हटले होते.
खोटी माहिती टीव्हीवर प्रसारित होऊ दिल्याबद्दल माझीच मला लाज वाटू लागली आहे. माझे वडिल युक्रेनचे तर आई मूळची रशियाची आहे. रशियाच्या जनतेने न घाबरता रस्त्यांवर उतरून निदर्शने करावीत. पुतीन आम्हा सर्वांना तुरुंगात डांबू शकत नाहीत असे ओवस्यान्निकोव्हा यांनी म्हटले आहे.
ओवस्यान्निकोव्हा यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या साहसाचे प्रचंड कौतुक होऊ लागले आहे. चॅनेल वन हा रशियातील सर्वात लोकप्रिय सरकारी टीव्ही चॅनेल आहे. हा चॅनेल युक्रेन युद्धावरून पुतीन यांचा दुष्प्रचार प्रसारित करत आहे.









