वृत्तसंस्था/ मेलबोर्न
एटीपी चषक टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनिल आणि इटलीचा बेरेटेनी यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. मेदव्हेदेवने उपांत्य लढतीत जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हचा तर बेरेटेनीने स्पेनच्या ऍग्युटचा पराभव केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात मेंदव्हेदेवने जर्मनीच्या व्हेरेव्हचा 3-6, 6-3, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यावेळी व्हेरेव्हला दुखापतीचा त्रास जाणवत होता. दुसऱया उपांत्य सामन्यात इटलीच्या बेरेटेनीने स्पेनच्या रॉबर्टो बॉटीस्टा ऍग्युटचा 6-3, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मेदेव्हेदेव आणि बेरेटेनी यांच्यात रविवारी जेतेपदासाठी लढत होईल.
या सांघिक स्पर्धेत बेरेटेनीने ऍग्युटचा पराभव करत इटली संघाला स्पेनवर 2-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला. इटलीच्या फॉगनेनीने आपल्या पहिल्या सामन्यात स्पेनच्या बुस्टाचा 6-2, 1-6, 6-4 असा पराभव केला होता. रशियाच्या रूबलेव्हने आपल्या देशाला विजयी सलामी मिळवून देताना स्ट्रफचा 3-6, 6-1, 6-2 असा पराभव केला होता.









