रोमानियात तैनात करणार टायफून लढाऊ विमान
वृत्तसंस्था / लंडन
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान आता ब्रिटननेही उडी घेतली आहे. ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सने स्वतःच्या अत्याधुनिक टायफून लढाऊ विमानांना रोमानियात तैनात करण्याची योजना आखली आहे. ही विमाने काळय़ा समुद्राच्या क्षेत्रांमध्ये हवाई देखरेख करणार असल्याचे ब्रिटिश आर्मीच्या प्रमुखाने सांगितले आहे. रोमानियामध्ये ब्रिटनचा एक सैन्यतळ आहे. येथूनच ब्रिटिश लढाऊ विमाने आणि ड्रोन उड्डाण करून सीरियात इस्लामिक स्टेटच्या विरोधात कारवाई करत असतात.
या टायफून लढाऊ विमानांना नंबर 1 एक्सपेडिशनरी लॉजिस्टिक्स स्क्वॉड्रन आणि नंबर 2 मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट स्क्वॉड्रनचे सैनिक सहाय्य करणार आहेत. चालू आठवडय़ातच त्यांना ब्रिटनच्या विविध वायुतळांवरून हटवत रोमानियामध्ये तैनात करण्यात आले आहे. ब्रिटनने याला नियमित प्रक्रिया ठरविले असले तरीही तज्ञांनी याला रशियाच्या वाढत्या आक्रमक धोरणाच्या प्रत्युत्तरादाखल उचलण्यात आलेले पाऊल संबोधिले आहे.
युक्रेनसोबत युद्धाभ्यास
टायफून लढाऊ विमानांना तैनात करण्याचा निर्णय दरवर्षी होणाऱया नाटोच्या एअर पोलिसिंग मिशन ऑपरेशन बिलॉक्सीचा हिस्सा आहे. यंदा उन्हाळय़ात युक्रेनसोबत संयुक्त युद्धाभ्यास करण्यासाठी 100 पेक्षा अधिक ब्रिटिश सैनिक कीव्ह येथे जाणार आहेत. ऑपरेशन बिलॉक्सी आमच्या सहकारी देशांच्या हवाई क्षेत्रांच्या देखरेखीसाठी असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
पुतीन यांच्यासोबत चर्चेची प्रतीक्षा
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चेची अद्याप प्रतीक्षा करत असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांनी म्हटले आहे. 3 आठवडय़ांपूर्वी रशियाच्या तोफगोळय़ांच्या हल्ल्यात युक्रेनचे 4 सैनिक मारले गेल्यावर जेलेंस्कीन यांनी चर्चेचे आवाहन केले हेते. पुतीन चर्चेस नकार देणार नसल्याची अपेक्षा असल्याचे युक्रेनच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
रशियाचे 80 हजार जवान सीमेवर
रशियाने पूर्व सीमेवर 41 हजार तर क्रीमियात 42 हजार सैनिकांना तैनात केल्याचा दावा युक्रेनच्या सरकारने केला आहे. यामुळे युक्रेनने देखील स्वतःच्या सीमावर्ती भागांमधील सैनिकांचे प्रमाण वाढविले आहे. युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांनी सीमावर्ती भागाचा दौरा करत सैनिकांचा उत्साह वाढविला आहे. सैनिकांना युद्धाभ्यासाच्या अंतर्गत तैनात करण्यात आले असून यामुळे कुणालाच धोका नसल्याचा दावा रशियाचे संरक्षण मंत्रालय असलेल्या पेमलिनने केला आहे.
क्रीमियावर रशियाचा कब्जा
2014 मध्ये रशियाने पूर्व युक्रेनवर (क्रीमिया) कब्जा करताना झालेल्या संघर्षात 14 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश जण युक्रेनचे रहिवासी होते. रशियाने पूर्व युक्रेनच्या क्षेत्रांमध्ये 28 हजार शस्त्रधारी लोकांनाही तैनात केले आहे. या लोकांना डॉनबास म्हणून ओळखले जाते. या लोकांनी 2015 पासूनच युक्रेन सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा पुकारला आहे.